अजित आगरकर यांना संधी नव्हती, पण…
चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन चांगलेच गाजले आणि ते त्यांच्या अंगलट आले. कारण बीसीसीआयने त्यांना या पदावरून काढून टाकले. त्यानंतर बीसीसीआय निवड समिती सदस्याच्या शोधात होती. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज करण्याची विनंतीही केली होती. त्यावेळी भारताचे काही क्रिकेटपटू पाच वर्षांची अट पूर्ण न झाल्याबद्दल या पदासाठी अर्ज करू शकत नव्हते. पण भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग मात्र या पदासाठी इच्छुक होता. पण या पदासाठी देण्यात येणारे मानधन त्याला कमी वाटत होते. जर सेहवागने या पदासाठी अर्ज केला असता तर अजितचा या पदासाठी निभाव लागला नसता. कारण सेहवागचा अनुभव आणि सामने अजितपेक्षा नक्कीच जास्त आहेत. त्यामुळे ही संधी खरं तर अजित यांच्यासाठी नव्हती. पण सेहवागने ऐनवेळी माघार घेतली आणि त्यामुळे अजित यांना या पदासाठी अर्ज करता आला.
निवड समितीसाठी कोण अर्ज करू शकतं, जाणून घ्या…
निवड समितीसाठी भारताचे कोणतेही माजी खेळाडू अर्ज करू शकतात. पण निवृत्ती घेतल्यावर पाच वर्षांनी ते या पदासाठी अर्ज करू शकतात. निवृत्ती नंतर खेळाडूंसाठी पाच वर्षांचा कुलिंग ऑफ पिरिएड ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेतली तर त्यानंतर तो पाच वर्षांमध्ये निवड समितीसाठी अर्ज करू शकत नाही, त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी आवश्यक असतो.
काय आहे निवड समितीसाठी अर्ज करण्याची पात्रता…
भारताच्या निवड समितीमध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यासाठी माजी खेळाडूंसाठी काही पात्रतेचे निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये जे माजी खेळाडू आहेत त्यांनी किमान निवड समिती पदासाठी अर्जदाराने किमान सात कसोटी सामने किंवा ३० प्रथम श्रेणी सामने किंवा १० वन-डे आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले असावेत. हे पात्रतेचे निकष जे माजी खेळाडू पूर्ण करत असतील त्यांनाच निवड समितीमध्ये स्थान मिळवता येऊ शकते.
अजित आगरकर हे थेट निवड समितीचे अध्यक्ष कसे काय झाले, जाणून घ्या…

चेतन शर्मा यांना जेव्हा निवड समितीमधून बेदखल करण्यात आले तेव्हा या कमिटीमध्ये चार सदस्य होते. यामध्ये शिव सुंदर दास, सलिल अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश होता. त्यानंतर पाचव्या निवड समिती सदस्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. शिव सुंदर दास यांनी भारतासाठी २३ कसोटी, ४ वनडे आणि तीन टी-२० सामने खेळले आहेत. सलिल अंकोला यांनी भारतासाठी एक कसोटी, २० वनडे आणि ५४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. सुब्रतो बॅनर्जी यांनी एक कसोटी, सहा वनडे आणि ५९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. श्रीधरन शरथ यांनी तर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. शरथ यांनी १३९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत तर ११६ लिस्ट ए सामने त्यांच्या नावावर आहेत. अजित आगरकर यांनी २६ कसोटी, १९१ वनडे आणि चार टी-२० सामने खेळलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला या पाचही सदस्यांमध्ये सर्वाधिक सामने हे अजित यांच्या नावावर आहेत. निवड समितीमध्ये ज्या खेळाडूच्या नावावर जास्त सामने असतात त्यांना साधारणपणे अध्यक्षपद दिले जाते, कारण त्या व्यक्तीच्या नावावर सामने जास्त असतात आणि अनुभवही जास्त असतो. त्यामुळे ज्याच्या नावावर जास्त सामने तो निवड समितीचा अध्यक्ष असल्याचे ठरवले जाते.
अजित आगरकर निवृत्तीनंतरही कार्यरत कसे राहिले, पाहा…
अजित आगरकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले, पण त्यांनी क्रिकेट मात्र सोडले नाही. त्यानंतर अजित हे मुंबईच्या संघाचे कर्णधार होते. स्थानिक क्रिकेटचा राजीनामा दिल्यावर अजित हे काही काळानंतर मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्ष झाले होते. त्यामुळे निवड समितीचे कामकाज कसे असते आणि अध्यक्ष त्यामध्ये नेमकी काय भूमिका बजावतात, हे त्यांना चांगलेच माहिती आहे. त्यानंतर अजित हे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे अजित हे गेल्या काही वर्षांत युवा खेळाडूंच्या चांगलेच संपर्कात आहेत आणि त्यांना या युवा खेळाडूंचा खेळ माहिती आहे. त्यामुळे भविष्यात खेळाडूंची निवड करताना त्यांना जास्त अडचण येणार नाही.
आता बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षपदी अजित आगरकर हे विराजमान झाले आहेत. त्यामुळे आता ते कोणती पावलं उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.