बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार मतदारसंघांवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वर्चस्व आहे. उर्वरित दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यातील भोर-वेल्हा-मुळशी या मतदारसंघातील आमदार संग्राम थोपटे आणि पवार कुटुंबाचे फार सलोख्याचे संबंध नाहीत. तसेच, पुरंदर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार समर्थक एकत्र आले, तर सुळे यांच्यासमोर चांगले आव्हान उभे राहू शकते. दरम्यान, काँग्रेसची भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची असल्याने दोन्ही आमदार सुळे यांना मदत करू शकतात. मात्र, सद्यस्थितीत बारामतीतील विविध मतदारसंघातून मताधिक्यासाठी सुळे यांना कष्ट करावे लागतील. त्याचवेळी राज्यभर फिरून इतर सहकाऱ्यांच्या प्रचाराचाही धुराही सांभाळावी लागणार आहे.
पवार विरुद्ध पवार?
बारामती विधानसभा मतदारसंघावर पवार कुटुंबाचे १९६७ पासून वर्चस्व आहे. गेल्या ४६ वर्षांत या मतदारसंघात पवार कुटुंबीयांनी एकत्र राहून सत्ता कायम ठेवली. अजित पवार यांनी आता बंडाची भूमिका घेत वेगळी चूल मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार हे एकमेकांसमोर उभे ठाकणार का, असा प्रश्न आहे. सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघाने कायमच एका लाखांहून अधिक मतांचे मताधिक्य दिले आहे आणि त्या जोरावर त्यांनी २०१४ आणि २०१९ ची लोकसभा राखली आहे.
इंदापूर, दौंडमध्ये संघर्षाची बिजे
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार दत्ता भरणे हे अजित पवार गटात; तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत या दोघांनीही सुळे यांच्याविरोधात भूमिका घेतली, तर या ठिकाणीही त्यांना कष्ट करावे लागणार आहेत. मात्र, भरणे यांच्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अडचण झाली आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग येथे असला, तरी सुळे यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. दौंडचे आमदार राहुल कुल आणि अजित पवारांचे संबंध फारसे चांगले नाहीत. माजी आमदार रमेश थोरात अजित पवारांसमवेत असल्यामुळे कुल अजित पवारांशी जुळवून घेणार का, हा प्रश्न आहे.
पुरंदर आणि भोर
पुरंदर आणि भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. अपवाद वगळता ‘भोर’वर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. भाजप आणि अजित पवार गट तसेच पुरंदर येथे विजय शिवतारे गटाची ताकद एकत्र केल्यास सुळे यांना तेथेही संघर्ष करावा लागेल, असे चित्र आहे.
खडकवासल्यातही अजित पवार
खडकवासला मतदारसंघातील ‘राष्ट्रवादी’चे बहुतांश नेते अजित पवारांच्या गटात सामील झाले आहेत. या गटाचे शहराध्यक्षपदी याच मतदारसंघात दिले जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर सातत्याने भाजपचा वरचष्मा राहिला आहे. सुळे यांच्याविरोधात सर्वाधिक मते याच मतदारसंघातून भाजपला मिळत आहेत. त्यांना अजित पवार गटाची साथ मिळाली तर सुळे येथे फटका बसण्याची शक्यता आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील आमदार
बारामती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)
इंदापूर दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट
दौंड राहुल कुल भाजप
पुरंदर संजय जगताप काँग्रेस
भोर-वेल्हा-मुळशी संग्राम थोपटे काँग्रेस
खडकवासला भीमराव तापकीर भाजप