म. टा. प्रतिनिधी, मुंबई: भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर मालकी हक्क सांगण्याची पवार कुटुंबातील लढाई आता रस्त्यावर आली आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र मेळाव्यांनी हे दाखवून दिले आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन नेत्यांच्या समर्थकांनी आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन करीत भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राचा खासकरून बंडखोर राष्ट्रवादी मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरा करणार असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवारांच्या दौऱ्यानंतर आपणही त्याच ठिकाणी प्रत्युत्तर सभा घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत स्पष्ट केले.

NCP: सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत आव्हान? भाजप अजित पवारांच्या साथीनं घड्याळ्याचे काटे उलटे फिरवणार? जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. पहिली सभा ते दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मंचर आंबेगावमध्ये घेणार आहेत. या सभेच्या नियोजनामुळे अजित पवार संतप्त झाले आहेत. मीही त्याच मतदारसंघात प्रत्युत्तरसभा घेणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. परिणामी येत्या काळात काका पुतण्यातील हा कलगीतुरा गाजण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे पाटलांनी काय चूक केली आहे, त्यांनी आपला मतदारसंघ विकासकामांच्या जोरावर बांधला आहे. मलाही थोडे बोलता येते. भाषण करता येते. लोक माझं ऐकतात. उद्या त्यांनी दौरा सुरू केला तर, मलाही तेथे सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल. मला त्यांना उत्तर द्यावे लागेल. मी गप्प बसलो तर लोक बोलतील की याच्यात काहीतरी खोट आहे. मी खोटा नाही, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मंत्री, शिवसेनेतील इच्छुकांमध्ये चलबिचल, शिंदेंपुढील आव्हानं वाढली, कारण…

दैवताने अशी भाषा करावी?

माझ्यासोबत येणाऱ्या आमदारांना धमकावण्यात येत आहे. एका आमदाराला वरिष्ठांनी काय सांगितले की, तू निवडूनच कसा येतो ते बघतो. अरे, हे नेते म्हणजे तुमच्या मुलासारखे असून, त्यांनी पक्षाला याआधी साथ दिली आहे. ही भाषा दैवताने करायची, वरिष्ठांनी करायची का, असा प्रश्न अजित पवार यांनी केला. शेवटी तो आमदार म्हणाला की, मला नको आमदारकी, मी घरी बसतो. कार्यकर्ता हा आपला परिवार आहे. त्याला असे बोलायचे का, माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जिवात जीव असेपर्यत मी अंतर देणार नाही, असे ते म्हणाले.

ठाण्याचा पठ्ठ्या, जितेंद्र आव्हाड लक्ष्य

शरद पवार यांनी असे काही लोक बरोबर घेतले आहेत जे संघटनेचे वाटोळे करत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले. बुधवारी झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी असे काही लोक बरोबर घेतले आहेत जे संघटनेचे वाटोळे करत आहेत. उदाहरण द्यायचे तर तो ठाण्याचा पठ्ठ्या. त्यांच्यामुळे ठाण्याचे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, वसंतराव डावखरे, किसन कथोरे आदी नेते पक्षाला सोडून गेले. अनेक नेते मला म्हणतात साहेब याला का मोठे करतात? आपल्यामध्ये जिवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजेत की, त्यांनी स्वतः नेतृत्व केलंच पाहिजे. त्यासोबतचे बेरजेचे राजकारण केले पाहिजे. प्रत्येक मंत्र्यानी ४-४ आमदार निवडून आणले पाहिजेत; परंतु ते तर आपलेच आमदार घालवतात तरीही साहेबांनीही त्यांनाच मोठे केले, असे म्हणत पवारांनी थेट आव्हाडांवर टीकास्त्र सोडले.

नेमणुकांमध्ये खोडा?

गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात सुप्रिया सुळे यांच्या आशीर्वादाने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची एकहाती सत्ता चालत होती. अजित पवार यांनी तालुक्यातील नेमणुका सांगितल्यास त्याही होत नव्हत्या. ठाण्यातील एका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेमणुकीवरून अजित पवार यांनी सांगूनही ती जाणीवपूर्वक करण्यात आली नव्हती. शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे कान भरण्यात जितेंद्र आव्हाड हेच सर्वाधिक पुढे असल्याची टीका अजित पवार समर्थक गेली चार वर्षे करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here