अमली पदार्थच्या प्रकरणातून आर्यन खानची सुटका होण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली ‘सीबीआय’ने वानखेडे व अन्य चार जणांविरोधात ‘एफआयआर’ दाखल केला आहे. त्याला वानखेडेंनी अॅड. स्नेहा सानप यांच्यामार्फत याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.
‘सुधारित कायद्यातील तरतुदींप्रमाणे सरकारी सेवकाकडून अवाजवी लाभ मिळवण्याच्या उद्देशाने लाच दिल्यास लाच देणाऱ्याविरोधातही कारवाई होते’, असे म्हणणे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्या. अजय गडकरी व न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी मांडले. तेव्हा, वानखेडे यांच्या याचिकेत असा कोणताही मुद्दा नसल्याने त्याबाबत आम्ही प्रतिज्ञापत्रात उत्तर मांडलेले नाही, असे सीबीआयने अॅड. कुलदीप पाटील यांच्यामार्फत निदर्शनास आणले. त्यानंतर पोंडा यांनी याचिकादुरुस्तीची परवानगी मागितली. खंडपीठाने ती दिली.
मात्र, त्याचवेळी पुन्हा याचिकादुरुस्तीची परवानगी दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यानुसार, खंडपीठाने वानखेडेंच्या याचिकेवरील पुढील सुनावणी २० जुलैला ठेवून तोपर्यंत त्यांना कठोर कारवाईपासून असलेले अंतरिम संरक्षणही कायम ठेवले. ‘वानखेडेंनी शाहरुख खानकडे २५ कोटींची लाच मागितली. त्यातील ५० लाख रुपये मिळाल्यानंतर ती शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीकडे परत देण्यात आली’, असा आरोप ‘सीबीआय’ने ठेवला आहे.
दरम्यान, आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रकाशझोतात आले होते. मात्र, नवाब मलिक यांनी आर्यन खान अटक प्रकरणातील त्रुटी दाखवून देत एनसीबीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर समीर वानखेडेंना पदावरुन हटवण्यात आलं होतं.