कांद्याचे दर स्थिर असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तर खर्चाचे देखील पैसे निघाले नाहीत, त्यातच वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न कांदा-बटाटा बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर होते. मात्र, शुक्रवार पासून घाऊक बाजारात कांदा वधारला आहे. कांद्याच्या दरामध्ये होणारी वाढ शेतकऱ्यांना समाधान देणार अस बोललं जातं आहे. कांद्याचे दर स्थिर, अवकाळी पाऊस आणि सद्या होणारा सततचा पाऊस याचा परिणाम कांद्यावर झालेला दिसत आहे, त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न कांदा-बटाटा बाजार समितीत टोमॅटोसह इतर भाज्या महाग झाल्या आहेत. अशातच सततच्या पावसामुळे बाजारातील आवक कमी झाल्याने कांदा प्रतिकिलो १६ ते २० रुपयांनी विक्री होत आहे. गेल्या काही दिवसांपासून एपीएमसीत कांद्याचे दर स्थिर होते. मात्र, गेले दोन दिवस बाजारात काद्यांची आवक कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. अशातच राज्यभरात पावसाचे आगमन झाले असल्याने ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे साधारणपणे जुलै महिन्यानंतर कांद्याचे दर वधारत असतात.
यंदा अवकाळी पावसामुळे साठवणुकीचा कांदादेखील भिजला असल्यामुळे मे महिन्यातच ठेवणीतला कांदा खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. अशातच एपीएमसी मार्केटमध्ये फक्त ८७ गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात काद्यांचे दर प्रतिकिलोला ४ ते ६ रुपयांनी वाढले असून १२-२० रुपयांनी विक्री होत आहे.
अनेक शेतकरी हे उन्हाळी कांदा साठवून ठेवतात, कारण उन्हाळी कांद्याना चांगला भाव मिळतो अशी आशा प्रत्येक शेतकऱ्याला असते मात्र अनेक वेळा शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडते. मात्र, ह्या वेळी अवकाळी पाऊस आणि सततच्या होणाऱ्या पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची कमी होणारी आवक पाहता कांद्याचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अनेक चाळी मध्ये ठेवलेला कांदा हा पावसामुळे खराब होत असताना कांद्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.