लखनऊ: बाळंत झालेल्या सुनेसाठी रुग्णालयात एसी खोली बुक न केल्यानं नातेवाईक भिडले. सुनेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांशी वाद घातला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच मुलीचे वडील, मुलगा आणि नातेवाईक यांच्याच कडाक्याचं भांडण झालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस तक्रार दाखल केली. सिव्हिल लाईन्समधील एका खासगी नर्सिंग होमच्या बाहेर ही घटना घडली. आवास-विकास वसाहतीत राहणाऱ्या रामकुमार यांनी सोमवारी पोलिसात तक्रार नोंदवली. ‘माझ्या मुलाचं लग्न लखनऊच्या फैजुल्लागंजमधील अलीगंजमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत झाला. ती गरोदर होती. प्रसुती कळा सुरू झाल्यानंतर आम्ही तिला सिव्हिल लाईन परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिला मुलगी झाली. रुग्णालयाचा खर्च तिनं दिला,’ असं रामकुमार यांनी पोलिसांना सांगितलं. सोमवारी बाळंत महिलेचे आई, वडील आणि नातेवाईक बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात आले. एसी नसलेली खोली पाहून ते संतापले. सुनेच्या माहेरच्या मंडळींनी एसी खोली बुक न केल्यावरुन आपल्याला शिवीगाळ केली. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी माझी पत्नी, दोन मुलींना बेदम मारहाण केली, असा आरोप रामकुमार यांनी केला. बाळंत झालेल्या महिलेच्या वडील, मुलांनी आणि नातेवाईकांनी नर्सिंग होमच्या बाहेर रस्त्यावर सासरच्या मंडळींवर हल्ला केल्याचा आरोप आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुनेच्या माहेरच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या आई, वडील आणि बहिणींनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे. आम्हाला तक्रार मिळाली असून तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मौर्य यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here