दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीवरुन वातावरण तापलं आहे. अनेक जण तिचं समर्थन करताहेत. तर, दीपिकाला लक्ष्य करून तिच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार घालण्यास सांगितलं जातंय, तिचं चारित्र्यहनन केलं जातंय. मराठी कलाकारांनी या विषयावर ‘मुंटा’कडे व्यक्त केलेल्या तीव्र भावना…

साफ दुर्लक्ष करा

आपल्या देशात प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुणीही कुठेही जाऊ शकतं किंवा व्यक्त होऊ शकतं. त्यावर इतर कुणी आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. तसंच उगाचच टीका करत राहण्यातही काही अर्थ नाही. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांचं आणि त्यावर टीका करणाऱ्यांचं मला काहीच वाटत नाही. फक्त कलाकारांच्या व्यक्त होण्यावरच बोललं जातं असं काही नाही. कोणाचंही व्यक्त होणं आवडलं नाही की त्यावर टीकेची झोड उठते. जगात काय घडतंय, याच्याशी त्या बोलणाऱ्यांचा फारसा संबंध असतोच असं नाही. फक्त सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांवर टीकाटिपण्णी करणं हेच त्यांचं काम असतं. या सगळ्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही, असं मला वाटतं. – सुबोध भावे, अभिनेता

गैर काय?

दीपिकाला किंवा या विषयावर व्यक्त होणाऱ्या कोणत्याही कलाकाराला इतकं धारेवर धरलं जाण्याची काहीच गरज नाहीय. आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यामुळे ती जर तिच्या कृतीतून व्यक्त झाली तर त्यात गैर काय? काही वर्षांपूर्वी ती मानसिक आरोग्यावर व्यक्त झाली होती, तेव्हा ही टीका करणारी मंडळी कुठे गेली होती? बरं तिचं व्यक्त होणं संयमी नव्हतं, तिची भाषा योग्य नव्हती किंवा तिची कृती आक्षेपार्ह होती असंही काही नव्हतं. मग तिच्याबद्दल हे असं वाट्टेल ते बोलणं कशाला? देशाची नागरिक म्हणून व्यक्त होण्याचा तिला पूर्णपणे अधिकार आहे. – सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

प्रसिद्धीसाठी नव्हे

प्रत्येक कलाकार हा माणूस आहे, स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. आचार विचारांचे इतर लोकांसारखेच अधिकार त्यालाही आहेत, हे कसे विसरून चालेल? मुळात सार्वजनिकरित्या एखादी भूमिका घेणं सोपं नाही. म्हणूनच बरेच लोक गप्प बसतात. त्यात कलाकारांनी घेतलेली भूमिका आपल्या विचारधारेशी मिळतीजुळती असली तर उदो उदो करायचा आणि नसली, तर अगदी हिन पातळीला जाऊन विरोध करायचा हे बरोबर नाही. कलाकार जर बोललेच नाहीत तर ‘हे सेलिब्रिटी आपल्याच विश्वात असतात, ह्यांना काय पडलंय समाजाचं, देशाचं?’ असंही म्हणणारे आपणच आहोत की. तिची भूमिका योग्य की अयोग्य याबद्दल मी बोलणार नाही. पण तिने भूमिका घ्यायचीच कशाला, असं मी अजिबात म्हणणार नाही, तिला तो अधिकार स्वतंत्र भारताच्या घटनेनं दिला आहे. मला तरी तिचा हा पब्लिसिटी स्टंट वगैरे वाटत नाही. – चिन्मयी सुमित, अभिनेत्री

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here