रावेर तालुक्यात बुधवारी मध्यरात्री पावसाने झोडपून काढले. तालुक्यासह व मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने सुकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपूर येथील नदीला पूर आला. नदीच्या पुरात बाबुराव रायसिंग बारेला व शेख इकबाल कुरेशी वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. रावेर शहरातील माजी नगरसेवक सुधीर गोपाल पाटील दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांचा रात्रीपासून शोध सुरू आहे. रसलपूरमध्ये बलेनो कार वाहून गेली असून, प्रवाशांनी गाडीतून उडी घेतल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले.
रात्री पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. रमजीपूर, रसलपूर, खिरोदा गावांतील अनेक घर, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपूरमध्ये आलेल्या पुरात चार गुरे वाहून गेली. खिरोदा व रावेर येथील दहा ते बारा गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. तालुक्यात एकूण २० बकऱ्या, गाय-बैल व म्हैस अशी २० गुरे पाण्यात वाहून दगावली आहेत, तर १४५ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.
हतनूरचे चार गेट अर्ध्या मीटरने उघडले
हतनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सकाळी १० वाजता हतनूर धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येऊन १३६ क्यूसेक (४८०३ क्यूसेक) विसर्ग तापी नदीपात्रता सोडण्यात येणार आहे.
रावेर, यावलमध्ये जोरधार
रावेर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रावेर महसूल मंडळात तब्बल ११८ मिमी, खिरोदा मंडळात ९१.३ मिमी, खानापूर ९० मिमी, सावदा ९१ मिमी, खिर्डी ७२ मिमी, निंभोरा ७८ मिमी एवढा पाऊस एकाच रात्रीत झाला. ऐनपूर या महसूल मंडळातदेखील ५८ मिमी पाऊस झाला. रावेर तालुक्यातील १ जून ते ६ जुलैपर्यंतची एकूण सरासरीची पावसाची तूटदेखील एकाच रात्रीत भरून निघाली. यावल तालुक्यात ४५ मिमी पावसाची नोंद झाली.