मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या तीन आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर या तिन्ही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता शरद पवार गटाकडे उरलेल्या मोजक्या आमदारांपैकी आणखी तीन आमदार अजित पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि विक्रमगढचे आमदार सुनील भुसारा यांनी अलीकडेच आम्ही शरद पवार यांच्यासोबत राहणार, असे ठामपणे सांगितले होते. हे तिघेही शरद पवार गटाच्या बैठकीलाही उपस्थित होते. मात्र, आता या तिघांनीही अजित पवार यांची भेट घेतल्याने ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

तुम्ही निवृत्त कधी होणार? अजितदादांच्या प्रश्नाला शरद पवारांचं ‘धडाकेबाज’ उत्तर

यापैकी राजेश टोपे आणि सुनील भुसारा यांनी गुरुवारी रात्री उशीरा देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतली. तर आमदार चेतन तुपे हे शुक्रवारी सकाळी देवगिरी बंगल्यावर पोहोचले. राजेश टोपे, सुनील भुसारा आणि चेतन तुपे या तिघांशी अजित पवारांची नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. परंतु, सरकारमध्ये सामील होण्याच्या मोबदल्यात या तिघांना अजित पवार यांच्याकडून काही आश्वासन देण्यात आले आहे का, याबाबत चर्चा रंगली आहे. कोरोना साथीच्या काळात राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून राज्यातील परिस्थितीत अत्यंत कार्यक्षमरित्या हाताळली होती. त्यामुळे राजेश टोपे अजित पवार गटात सामील झाल्यास त्यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का, हेदेखील आगामी काळात पाहावे लागेल.

Sharad Pawar : ज्या आमदाराला नक्षलवाद्यांपासून वाचवलं, त्यानंही पवारांची साथ सोडली, कोण आहेत धर्मराव आत्राम?

तर दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत लढायचा निश्चय कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक-एक आमदार अजित पवार यांच्याकडे जात असतानाही शरद पवार यांचा निर्धार कायम आहे. मी राज्यभर फिरून, पक्ष नव्याने उभा करेन, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवं नेतृत्त्व निर्माण करेन, असे शरद पवार यांनी यापूर्वी म्हटले होते. मात्र, आमदार एक-एक करुन असेच अजित पवार गटात जात राहिल्यास शरद पवार यांच्या भूमिकेत काही बदल होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा आपला निवडणूक आयोगावर विश्वास आहे, असं मत शरद पवार यांनी दिलं. तसेच यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातही जाण्याचे संकेत दिले.

अजितदादांना पक्षात पद न देऊन चूक झाली का?; पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवारांचं सडेतोड उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here