पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हा टाइल्स फिटिंगचे काम करायचा. रूपेश हा कंत्राटदाराकडे श्रमिक आहे. दोघेही मित्र आहेत. गेल्या महिन्यात भारतचे आपल्या महिला नातेवाइकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय रूपेशला आला. त्याने भारतला जाब विचारला. दोघांमध्ये वाद झाला. भारत व त्याच्या दोन मित्रांनी रूपेशला मारहाण केली.
या अपमानाचा बदला घेण्याचा निर्णय रूपेशने घेतला. पाच दिवसांपूर्वी त्याने फ्लिपकार्डद्वारे ५०० रुपयांमध्ये ऑनलाइन चाकू मागविला. त्यानंतर तो भारतच्या हत्येची संधी शोधायला लागला. बुधवारी रात्री भारत हा त्याचे मित्र दीपक मेश्राम व सुखदेव सहारे यांच्यासोबत सहारे भोजनालयासमोर बसला होता. यावेळी रूपेश हातात चाकू घेऊन तेथे आला. त्याने भारतच्या पाठीवर तब्बल १५ वार केले. घटनास्थळीच भारतचा मृत्यू झाला.
घटनेनंतर रूपेश पसार झाला. घटनेची माहिती मिळताच भारतचे नातेवाईक तेथे पोहोचले. ऑटोने त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून रुपेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी दुपारी रूपेशला अटक करून यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले.