मनमाड येथे राहणारी विवाहित महिला राणी दशरथ चव्हाण या आजारी वडिलांना भेटण्यासाठी रो. हाऊस नंबर ४, उषा अपार्टमेंट, अशोकनगर सातपूर येथे आल्या होत्या राणी चव्हाण ह्या सोमवारी सायंकाळी धुतलेले कपडे काढण्यासाठी टेरेसवर गेल्या असता टेरेसवरून गेलेल्या वीज तारांना स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने त्या पाच फुट लांब फेकल्या गेल्या.
परिसरातील नागरिकांना आणि घरातील सदस्यांना मोठा आवाज आल्याने घरातील सर्व मंडळी बाहेर आले. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला होता कुटुंबीय आणि परिसरातील लोकांनी त्यांना तात्काळ अशोक नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राणी चव्हाण यांच्यावर उपचार सुरु आहेत. राणी चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या ५५ ते ६० टक्के भाजल्या आहेत.
दरम्यान, घरांवरून गेलेल्या मोकळ्या वीज तारा काढण्याबाबत परिसरातील लोकांनी वारंवार निवेदने देऊनही विद्युत मंडळ दखल घेत नसल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. विद्युत् मंडळाचा भोंगळ कारभार आणि हलगर्जीपणामुळे अजून किती दुर्दैवी घटना घडणार? असा सवाल परिसरातील संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत.
ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधीना कळवूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे तर काहींनी प्रतिसादच न दिल्याचे नागरिक म्हणत आहेत. ह्या सर्वसामान्य कुटुंबास शासकीय नियमानुसार मिळणारी मदत मिळण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
महावितरणकडून अनेक पावसाळापूर्व कामे केली जात असतात. परंतु, अनेक ठिकाणी महावितरणकडून काही कामांकडे दुर्लक्ष केले गेल्याचे नागरिक म्हणत आहेत. या घटनेनंतर परिसरातील लोमकळणाऱ्या विजेच्या तारा भूमिगत करावया, अन्यथा या तारांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.