खारकोपर ते उरण ही बहुप्रतिक्षित लोकल सुरू होण्यापूर्वीच उरणच्या स्थानकात अंडरग्राउंडमध्ये पावसामुळे पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे ही लोकल सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील स्थानकांच्या कामांची पोलखोल झाली आहे. उरणमधील काही तरुणांनी स्थानकात साचलेल्या या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला. तर यापूर्वी महिलांनी लोकल सुरू होण्यासाठी स्थानकात ‘कब आओगे’ सारखी गाणी गात लोकल सुरू करण्याची मागणी केली होती.
अशातच उरण लोकल सुरू होण्याची येथील नागरिक वाट पाहत आहेत. त्यातच यासाठी ‘तारीख पे तारीख’ही जाहीर झाल्या आहेत. त्याचवेळी पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांत चार ते पाच फूट पाणी साचल्याने पावसाळ्यात या स्थानकांची स्थिती काय असणार याचे भविष्यच दिसू लागले आहे.
उरण व द्रोणागिरी दोन्ही स्थानके अंधारात
पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून मागील आठवडाभरापासून उरण व द्रोणागिरी ही दोन्ही स्थानके अंधारात आहेत. या संदर्भात रेल्वे विभागाशी संपर्क साधला असता या दोन्ही स्थानकांच्या विजेच्या चाचण्या सुरू असून लवकरच वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती दिली आहे.
उरण रेल्वे स्थानकात आताच जर तळे साचत असेल तर येणाऱ्या काळात जर मुसळधार पाऊस झाला तर ह्या रेल्वे स्थानकाची काय स्थिती असेल हे आताच दिसू लागले आहे. पावसाळ्यामध्ये अगोदरच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यात उरण रेल्वे स्थानकासारखी परस्थिती असेल तर रेल्वे प्रवाशांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला असून पावसाळा सुरू होताच उरण रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्याने कामाची पोलखोल तर केलीच पण उरण मधील अनेक तरुणांनी साचलेल्या पाण्याची संधी साधून मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला.