मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट सरकारला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्याची भूमिका घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडी कमकुवत झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आलं आहे. ठाण्यातील मनसे नेते अभिजीत पानसे यांनी कालच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीत मनसेकडून उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं बोललं जात आहे. राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास ते सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. मात्र हे समीकरण उदयास येऊ नये, यासाठी शिंदे यांनी खबरदारी घेत आज राज ठाकरेंची भेट घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या वर्षभरात अनेकदा राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या जवळकीचं रुपांतर अद्याप राजकीय युतीमध्ये झालेलं नाही. अशातच भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये आता अजित पवारांची राष्ट्रवादीही सहभागी झाल्याने संपूर्ण राजकीय चित्र पालटलं आहे. परिणामी गेल्या वर्षभरात युती सरकारसोबत दिसणारे राज ठाकरे आगामी काळात महाविकास आघाडीच्या जवळ जाण्याची चिन्हे आहेत. मात्र आजच्या भेटीनंतर राज हे आपल्या आधीच्या भूमिकेवरच कायम राहतात की आगामी काळात सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here