पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप घडवला आहे. या शपथविधीनंतर अजित पवार आपले होमग्राउंड असलेल्या पुणे शहरात शनिवारी प्रथमच येणार होते. मात्र अजित पवार यांचा उद्याचा पुणे दौरा रद्द झाला आहे. ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने त्यांचा पुणे दौरा रद्द झाला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत बंड केल्यानंतर अजित पवार यांना पुणे शहरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. शहरातील दोनपैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार सुनिल टिंगरे यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. तर बहुतांश पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी देखील अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ५० पेक्षा जास्त नॉटरिचेबल असणारे नगरसेवक देखील अजित पवारांच्या उद्याच्या पुणे दौऱ्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जात होतं. तर, नवनिर्वाचित शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पुण्यात अजित पवरांच्या जोरदार स्वागत आणि शक्तिप्रदर्शनाची तयारी केली होती.

उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण

अजित पवार उद्या सकाळी शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपला पुणे दौरा सुरू करणार होते. त्यानंतर चिंतामणी ज्ञानपीठ आयोजित गुरुजन गौरव समारंभ या कार्यक्रमाला गणेश कला क्रीडा मंदिर येथे हजेरी लावणार होते. अजित पवार समर्थक नेते आप्पा रेणुसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला ३ जुलैला होणारा हा कार्यक्रम राज्यातील राजकीय भूकंपामुळे पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता देखील अजित पवार हे गडचिरोलीला जाणार असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान या कार्यमानंतर अजित पवार हे महात्मा फुले वाडा येथे जाऊन महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करणार असल्याची देखील माहिती होती.

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर ज्यांची भूमिका अजून अस्पष्ट आहे अशा नेत्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी अजित पवारांचा उद्याचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. तसेच उद्या पुण्यात अजित पवार गटाकडून मोठे शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर तात्पुरतं पाणी पडलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here