नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांशी ‘गुफ्तगू’ केल्यानंतर सरद पवार भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात धडक देऊन भुजबळांची पोलखोल करणार असल्याने पवारांच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पवार येवल्यात असतानाच छगन भुजबळही नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. गेल्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली असून, अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचे विश्वासू छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे-पाटील यांचीही साथ लाभली आहे. त्यामुळे हे बंड पवारांच्या जिव्हारी लागले असून, बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी पवार स्वत:च आता रिंगणात उतरले आहेत.
नाशिक जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी अजित पवारांची साथ दिली आहे. त्यामुळे अजित पवारांसह बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी शरद पवार राज्याचा दौरा करणार असून, या दौऱ्याची सुरुवात ते छगन भुजबळांच्या येवल्यापासून करणार आहेत. आज, शनिवारी सकाळी पवार नाशिकमध्ये दाखल होत असून, त्यानंतर दुपारी तीन वाजता येवल्यात दाखल होऊन जाहीर सभा घेणार आहेत. या सभेनंतर पवार नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. पवारांच्या या सभा आणि बैठकांची जबाबदारी राष्ट्रवादीचे खजिनदार हेमंत टकले आणि जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येवल्यातील सभेची धुरा माणिकराव शिंदे सांभाळत असून, या सभेची जय्यत तयारी सुरू आहे.
रोहित पवारही दाखल
शरद पवार यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे नेते तयारी करीत असतानाच या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार रोहित पवार शुक्रवारीच नाशिकमध्ये दाखल झाले. शरद पवारांची सभा यशस्वी करण्यासह नाशिकमधील पवारांच्या जुन्या निष्ठावंतांशी संपर्क करून त्यांनी रात्री बैठक घेतली. आज, शनिवारी सकाळीच ते येवल्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे आजोबांसाठी थेट नातूच रिंगणात उतरला असल्याचे चित्र आहे.
मंत्रिपदानंतर भुजबळ प्रथमच शहरात
शरद पवार हे थेट छगन भुजबळांना आव्हान देण्यासाठी नाशिकसह येवल्यात दाखल होत असताना पवारांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी मंत्री भुजबळ आज, शनिवारी नाशिकमध्ये दाखल होत आहेत. मंत्री झाल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यासाठीचीही जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे भुजबळांच्या दौऱ्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीकडून सभेचा टीझर
बंडखोरांविरोधात रिंगणात उतरलेल्या शरद पवारांच्या येवल्यातील सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘८३ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात..’ असा टीझर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला येथे फोडणार, शनिवार, दि. ८ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता येवला, नाशिक येथे होणार ऐतिहासिक सभा, शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढणार…’ अशा आशयाचा टीझर चर्चेचा विषय बनला आहे.