शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही बिलकुल नाराज नाही. आम्ही सर्वजण समाधानी आहोत. आम्ही सर्वांनी आमच्या माना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर ठेवल्या आहेत. कोणीही नाराज नाही. शिवसेना, भाजप ही महायुती शपथ घेण्याआधी नऊ पक्षांची होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष वाढला आणि वज्रमुठ ढिली झाली. वज्रमुठीतील जो महाराष्ट्राला हवाहवासा चेहरा होता, तोच महायुतीमध्ये आलेला आहे. यामुळे आम्ही सर्वांनी समजावून घेतल आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे स्वागत केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार यांचा विचार वेगळा होता. आता विचार वेगळा आहे. त्यांचे विचार धोरण बदलल्यामुळे बदलत्या धोरणानुसार बदलावे लागते. शरद पवार हा महत्त्वाचा चेहरा आहे, पण सर्वच चेहरे महायुतीत आले, तर पुढे ब्लँक राहील. सध्या चालणार नाणं बघणं गरजेचं आहे. अजितदादांची कामांची पद्धत वेगळी आहे, त्यांनी नमूद केल.
आमचं सरकार डबल इंजिनचं बुलेट ट्रेन झालं आहे. माध्यमांनी आता सामंज्यसाची भूमिका घेणे गरजेचे आहे. शिंदे गट नाराज अशा वावड्या उठवणे बंद करा, असे आवाहन त्यांनी केले. संजय राऊत यांनी १७ जण संपर्कात असून चार जणांनी मला फोन केला असल्याचं ते म्हणत आहेत. या विधानावर संजय राऊत यांनी संपर्कात असणाऱ्यांची नावे जाहीर करावी. राऊत पोपट हा खोट्या चिट्ठी काढतो. याआधी देखील विनायक राऊतांनी अनुभव घेतलाय, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीबद्दल देसाई म्हणाले की, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री भेटीबाबत ते दोघेच बोलू शकतात. आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीमधील जागा समजली का? महाविकास आघाडी आता तुटायला लागली. त्यामधील एक एक मोहरा बाजूला पडतोय. स्वतःचं बघा ना स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून. आदित्य ठाकरेंना देखील आता संजय राऊत यांची सवय लागली, असा टोला देसाईंनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
पालकमंत्री पदाबाबत विचारले असता देसाई म्हणाले की, साताऱ्याचा पालकमंत्री बदलाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. अजित पवार यांना राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव हे सध्यातरी मिळू शकते असं आम्हाला वाटतं कारण ४० हून अधिक आमदार त्यांच्या सोबत आहेत. त्यांना चिन्ह मिळावे या आमच्या शुभेच्छा आहेत.