म. टा. प्रतिनिधी, जळगाव : शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावचे भूमिपुत्र असलेले अनिल पाटील शुक्रवारी मोठा गाजावाजा करीत पहिल्यांदाच शहरात आले. परंतु, त्यांच्या स्वागतासाठी चक्क एका आश्रमशाळेतील सुमारे शंभर विद्यार्थ्यांना आणण्यात आले. मुलांचा जीव धोक्यात घालून त्यांना रस्त्याच्या दुतर्फा उभे करून मंत्रीमहोदयांना मानवंदनाही घडविण्यात आली. त्यापूर्वी मंत्र्यांच्या आगमनास उशीर झाल्याने या विद्यार्थ्यांना दीड-दोन तास रस्त्यावरच उन्हात तिष्ठत बसावे लागले. विद्यार्थ्यांना घडविलेल्या या कवायतींची दृश्यफीत व्हायरल झाल्यानंतर नाराजीचे सूर उमटत आहेत.अजित पवार यांच्या बंडात सहभागी झालेले अनिल पाटील शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. अमळनेरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी बॅण्ड लावून समर्थकांनी तोबा गर्दी केली. काही समर्थकांनी जवळील आश्रमशाळेच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांना बोलावून घेत रस्त्याच्या दुतर्फा बसविले. मंत्रीमहोदयांच्या आगमनाकडे नजरा लावून बसलेल्या या मुलांची कधी तिष्ठत उभे राहण्याची, तर कधी कडेच्या खडीवर बसण्याची कसरत सुरू होती. पाचवी ते आठवीपर्यंतच्या या विद्यार्थ्यांना नेमके कशासाठी बोलावले हेसुद्धा सुरुवातीला माहिती नव्हते. राज्य महामार्गावर चिमुरड्यांचा जीव धोक्यात का घालण्यात आला? जर काही बरे-वाईट घडले असते तर त्याला जबाबदार कोण? असे सवाल नेटकऱ्यांनी व्हायरल दृश्यफीतीवर उपस्थित केले.उन्हामुळे मुले कासावीसराज्य महामार्ग असल्याने मुलांना अपघाताचा धोका होऊ शकतो, एवढा साधा विचारदेखील आयोजकांनी केला नाही. मंत्री यायला उशीर झाल्याने विद्यार्थी कासावीस झाले होते. मंत्र्यांची वाहने आल्यावर विद्यार्थ्यांकडून सॅल्यूटही देण्यात आला. आता पोलिसांसह सरकारी यंत्रणा तेव्हा कुठे गेली होती, अशी विचारणा समाजमाध्यमांत होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी मात्र या प्रकाराचा लागलीच निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना त्याऐवजी त्यांचा मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी वापर होणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विरोधी गटाने नोंदवली.मंत्र्यांचा संपर्क होईनाभाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेचे हे विद्यार्थी असल्याचे समजते. घडल्या प्रकाराबाबत संबंधित मंत्री महोदयांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता, ‘ते सध्या व्यग्र आहेत’, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. आश्रमशाळा प्रशासनाकडूनही कुणी बोलायला तयार होईना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here