म. टा. वृत्तसेवा, पालघर: स्मशानभूमीतील छताला पत्र्यांचे आच्छादन नसल्याने, येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना भर पावसात सरणावर पत्रे धरून आपल्या नातेवाइकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात समोर आली आहे. या स्मशानभूमीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाणगावजवळील साखरे गावच्या धोडीपाडा येथे गोविंद वाळू करमोडा या शंभरी पार केलेल्या वृद्धाचा नुकताच मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्यात आले. यावेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता.

मात्र, स्मशानभूमीच्या छतावर पत्र्यांचे आच्छादन नसल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृताच्या कुटुंबीयांना मोठी कसरत करावी लागली. सरणावर पत्रे धरून पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले. या सर्व घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून, यामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे.
दोन दिवसांपूर्वीच पालघरमधील किराट गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने भर पावसात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले होते. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने येथील दुर्गम भागांतील नागरिकांना मृत्यूनंतरही मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचे उघड झाल आहे.