सध्या महाराष्ट्रभर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२० ची परीक्षा ह्या पार पडल्या आणि त्याचा नुकताच निकाल लागला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील देवी बाभुळगाव येथील दिगंबर जोगदंड या शेतकऱ्याच्या मुलाने ५४ रँकमध्ये येऊन उमेश दिगंबर जोगदंड याने पोलीस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. बाबुळगावातील पहिलाच अधिकारी आणि पहिलाच पोलीस उपनिरीक्षक उमेश बनल्याने चक्क गावकऱ्यांनी डीजे लावून या उमेशची गाडीतुन मिरवणूक काढत हा जल्लोष साजरा केला आहे.
उमेशची परिस्थिती अत्यंत खडतर. आई-वडील शेतकरी तरी उराशी बाळगलेलं स्वप्न हे पूर्ण करायचं हे उमेशने ठरवलं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना देखील उमेशला करावा लागला. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होण्यासाठी त्यांने दिवस रात्र अभ्यास देखील केला. मात्र ऐन परीक्षा वेळीच उमेशला डेंगू हा आजार झाला. यात अत्यंत गळून गेलेल्या अवस्थेतही त्याची परवा न करता उमेशने ही परीक्षा दिली. अखेर आपलं यश उमेशनी गाठल्याने त्याचं गावासोबत जिल्ह्यातही कौतुक केलं जात आहे.
यामध्ये घरच्यांसोबत गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढून त्याला शुभेच्छा देत गुलालाची उधळण केली. चक्क गावात पहिल्यांदाच लग्न व्यतिरिक्त डीजे वाजत असल्याने आणि तोही गावातल्या मुलांने गावाची मान महाराष्ट्रात उंचावल्याने यात गावातील प्रत्येक व्यक्ती हा जल्लोष करताना पाहायला मिळाला. उमेश दिगंबर जोगदंड हा गावातील पहिला अधिकारी आणि पहिलाच पोलीस उपनिरीक्षक ठरल्याने त्याचं पंचक्रोशीतील नेतेमंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर हे कौतुक करत आहे. त्याचा सत्कार देखील अनेक ठिकाणी होत आहे.