मुंबई : शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात जात आधी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि नंतर राष्ट्रवादीवरही दावा सांगितला. अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती त्यांच्या गटातील नेत्यांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे खरंच शरद पवार यांच्या हातून पक्षावरील पकड निसटली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र ‘सी व्होटर’ या संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणाने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अजूनही शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे.

‘तुमच्या मते राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण,’ असा प्रश्न ‘सी व्होटर’कडून राज्यातील जनतेला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तब्बल ६६ टक्के लोकांना शरद पवार यांच्या बाजूने, तर केवळ २५ टक्के लोकांनी अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. तसंच ९ टक्के लोक अजूनही संभ्रमात असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आमदार आणि पक्षातील पहिल्या फळीतील दिग्गज नेत्यांच्या साथीने पक्ष काबीज करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरीही अजूनही जनता मात्र शरद पवारांच्या बाजूने असल्याचं दिसत आहे.

फडणवीसांच्या जवळचा आमदार अजितदादांना भिडला, निधीचा विषय काढताच तुटून पडला

शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीला उभारी देऊ शकतील?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ज्या नेत्यांना पक्षाच्या स्थापनेपासून मोठमोठी पदे दिली, तेच नेते दुरावल्याने शरद पवार हे राजकीय संकटात सापडले आहेत. मात्र तरीही ८३ वर्षीय शरद पवार पुन्हा लढण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. अशा स्थितीत ते पुन्हा पक्षाला उभारी देऊ शकतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र या प्रश्नावरही जनतेने सकारात्मक कौल दिला असून ५७ टक्के लोकांना शरद पवार हे पुन्हा राष्ट्रवादी जोमाने उभी करण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास वाटत असल्याचं सी व्होटरचा सर्व्हे सांगत आहे. तर ३७ टक्के लोकांना ही शक्यता प्रत्यक्षात येईल, असे वाटत नाही. तसंच ६ टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदारांचं पाठबळ, राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांची साथ आणि केंद्र व राज्यातील सत्तेची ताकद आता अजित पवार यांच्या पाठीशी आहे. मात्र त्यांचा मुकाबला आहे तो ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय कारकीर्द गाजवणाऱ्या शरद पवार यांच्याशी आणि ही लढाई अजित पवार यांना तितकीशी सोपी असणार नाही, हेच या ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here