वृत्तसंस्था, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. या हिंसाचारात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आठ सदस्य, भाजप, माकप, काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) यांचा प्रत्येकी एक कार्यकर्ता ठार झाला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून या हिंसाचाराला सुरुवात झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस चाचणी’ म्हणून विश्लेषक बंगालमधील या निवडणुकीकडे पाहत आहेत. शनिवारी झालेल्या मतदानादरम्यान मतपेट्यांची चोरी, जाळपोळ आणि राजकीय कार्यकर्त्यांविरोधात जनक्षोभाचे दृश्यही पाहायला मिळाले. मुर्शिदाबाद, नादिया आणि कूचबिहार जिल्ह्यांव्यतिरिक्त दक्षिण २४ परगणामधील भांगर आणि पूर्व मेदिनीपूरमधील नंदीग्राममध्ये हिंसाचार झाला आहे.

राज्यातील ग्रामीण भागांतील ७३,८८७ जागांवर शनिवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, ५.६७ कोटी मतदार जवळपास २.०६ लाख उमेदवारांचे भवितव्य ठरवतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी तीन वाजेपर्यंत ५०.५२ टक्के मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात २२ जिल्ह्यांमध्ये ६३,२२९ ग्रामपंचायतींच्या जागा आणि ९,७३० पंचायत समित्यांच्या जागा आहेत, तर २० जिल्ह्यांमध्ये ९२८ जिल्हा परिषदेच्या जागा आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर बंगालमध्ये BJP नेत्याचा रहस्यमय मृत्यू; शेतात जे दिसलं ते भयंकर
राज्यपाल जखमींना भेटले

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी उत्तर २४ परगणामधील विविध भागांना भेटी दिल्या. हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. ‘वाटेत असलेल्या नागरिकांनी ताफा थांबवण्याची विनंती केली. सांगण्यासारखे कितीतरी किस्से आहेत, आजूबाजूला घडणाऱ्या खुनाच्या घटना त्यांनी मला सांगितल्या. गुंडांनी मतदान केंद्रांवर जाऊ दिले नाही आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही, असेही लोकांनी सांगितले,’ असे बोस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here