नाशिक :‘टीचर ऑफ द मिलेनियम’ म्हणून ओळखले जाणारे शैक्षणिक क्षेत्रातील दार्शनिक, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव, महासंचालक प्राचार्य सर डॉ. मो. स. गोसावी यांचे आज रविवारी (९ जुलै) पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. संस्थेलाच नव्हे तर एकंदर शिक्षण क्षेत्राला काळाबरोबर पुढे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या जाण्याने एक ध्यासपर्व संपले असल्याची भावना समाजाच्या सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

प्राचार्य गोसावी अखेरपर्यंत कार्यरत होते. पुण्याच्या बी. एम. सी. सी. महाविद्यालयातून १९५८ साली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नाशिकला १९५७ साली सुरु झालेल्या बी. वाय. के वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. सर्वात तरुण वयात प्राचार्य होण्याचा मान त्याना मिळाला. संस्थेचे संस्थापक प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या शब्दावरून ते सनदी सेवा क्षेत्र सोडून शिक्षणात आले आणि पुढची साडेसात दशके त्यांनी व्रतस्थपणे काम करून संस्थेला आणि व्यवसायाला आधुनिक रूप दिले. प्राचार्यांचे प्राचार्य अशीच त्यांची ओळख झाली.

Sharad Pawar : शरद पवार की छगन भुजबळ, नाशिकमध्ये कुणी मारली बाजी, येवल्यात काय घडलं?
पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम केले. जे. डी. सी. बिटको इन्स्टिट्यूटच्या रूपाने व्यवस्थापन शास्त्राची गंगा त्यांनी उत्तर महाराष्ट्रात आणली. नाशिक बाहेरील दिग्गज विषय तज्ज्ञांना बोलावून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यावर त्यांनी भर दिला. बी. वाय. के. महाविद्यालयात पुनर्रचीत अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवून एक वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला.

संस्थेच्या बोर्डी कोसबाड केंद्रात शेतीविषयक अभ्यासक्रम आणि नाशिकला एस. एम. आर. के. महाविद्यालयाच्या रूपाने महिलांना शिक्षणाचे स्वतंत्र दालन खुले करून देणे अशी पथदर्शक कामगिरी त्यांनी केली. वाणिज्य, व्यवस्थापन या विषयाबरोबरच वेदशास्त्र, साहित्य, कला, अध्यात्म, योगविद्या अशा विषयातही प्राचार्य गोसावी यांचा संचार होता. आपल्या प्रासादिक वाणी आणि व्यक्तिमत्वाने समोरच्यावर त्यांची पटकन छाप पडत असे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, हॉटेल एमराल्ड पार्क येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिवंगत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ मो. स गोसावी सर यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून ते मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत.

प्राचार्य गोसावी यांचं पार्थिव बी. वाय. के. महाविद्यालात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून सायंकाळी ५.३० वाजता अंतिम संस्कार होतील, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

आधी नवरा गायब, नंतर लेकांसह आई, एकाच कुटुंबातील चारजण बेपत्ता; रत्नागिरीत खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here