म. टा. प्रतिनिधी, पुणे (लोणावळा) : तळेगाव दाभाडेजवळील इंदोरी गावच्या हद्दीतील कुंडमळा येथील पाण्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या ओंकार गायकवाड या तरुणाचा मृतदेह शोधण्यात आपत्कालीन पथकाला तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर यश आले. ओंकारसोबत असलेला त्याचा मित्र आदित्य गायकवाड याने वाहून गेलेल्या ओंकारचा शोध लागत नसल्यामुळे याच ठिकाणी पाण्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, तेथील स्थानिकांनी प्रसंगावधान राखून दक्षतेने आदित्यला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.
ओंकार गायकवाड (वय २४, सध्या रा. चाकण, खेड, मूळ रा. पारनेर) असे या वाहून गेलेल्या तरुणाचे तरुणाचे नाव आहे. वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी ओंकार मित्रांसोबत इंदोरी येथील कुंडमळा येथे आला होता. संततधार पावसामुळे मावळातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कुंडमळ्यातही पाण्याचा मोठा वेगवान प्रवाह सुरू आहे; तरीही या प्रवाहात ओंकार उतरल्याने तो वाहून गेला होता.

शुक्रवारपासून तळेगाव दाभाडे पोलीस लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र, वन्यजीव रक्षक संघटना व ‘आपदा मित्र, मावळ’च्या आपत्कालीन पथकांचे सदस्य ओंकारचा शोध घेत होते. अखेर रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ओंकारचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग, वन्यजीव रक्षक मावळ व ‘आपदा मित्र’ या संघटनांना यश आले.