मुंबई: राज्यात सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु असल्याने गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांनी आमदारांचा मोठा गट फोडून पक्षावर दावा सांगितला होता. इतर राजकीय पक्षांनाही अधुनमधून धक्के बसत आहेत. यामध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही (मनसे) समावेश झाला आहे. मनसेच्या मुंबईतील एकमेव माजी नगरसेवकाने राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. मनसेचे माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केल्याचे सांगण्यात आले होते. वैयक्तिक कारण सांगत संजय तुरडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु,संजय तुरडे यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलेला नाही. तुरडे यांनी केवळ पक्षातील पदांचा राजीनामा दिलेला आहे. मी कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही. तसेच दुसऱ्या पक्षात जाणारही नाही, असे वचन संजय तुरडे यांनी राज ठाकरे यांना दिल्याचे समजते. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ लागली आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) सर्व ताकद पणाला लावली जात आहे. अशातच मनसेच्या मुंबईतील एकमेव माजी नगरसेवकाने सर्व पदांचा त्याग केल्याने पक्षाच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

मनसेचे संजय तुरडे यांच्यावर हल्ला

संजय तुरडे हे कलिना येथील प्रभाग क्रमांक १६६ चे नगरसेवक होते. मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत मनसेचे एकूण ७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक गळाला लावले होते. मात्र, संजय तुरडे हे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. निवडणुकीची मुदत उलटून गेल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे सभागृह विसर्जित करण्यात आले होते. सध्या महानगरपालिकेचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जात आहे.

सामनाच्या कार्यालयात ठाकरेंचे शिलेदार भेटले, बोलणं आटोपताच एक मातोश्रीवर, अन् दुसऱ्याने तातडीने शिवतीर्थ गाठलं

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावून तशी मागणी केली होती. यानंतर मनसे नेते अभिजित पानसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली होती. या भेटीनंतर पानसे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. तर संजय राऊत तातडीने मातोश्रीवर गेले होते. यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, संजय राऊत आणि पानसे यांनी या वृत्ताचा इन्कार केला होता. युती करायची असेल तर आम्हाला मध्यस्थीची गरज लागणार नाही. राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. युतीची बोलणी करायची असल्यास उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना थेट फोन करु शकतात, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

आम्ही सोबत एकत्र वाढलो, मध्यस्थीची गरज नाही; मनसेसोबत युतीवर संजय राऊतांचं उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here