याबाबत अधिक माहिती अशी की, श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी विश्वस्त कोट्यातूनही दोनशे रुपये मोजावे लागणार होते. तसेच देवीच्या अभिषेकासाठी पाचशे रुपये आकारण्यात येणार असल्याचा निर्णय तुळजाभावानी मंदिर समितीने घेतला होता. सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, भाविकांचा वाढता विरोध पाहता हे निर्णय मागे घेण्यात आले आहेत.
तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त कोट्यातून भाविकांना व्हीआयपी दर्शनाची मोफत मुभा यापूर्वी उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, त्यात बदल करत अभिषेक पूजेसाठी थेट ५० रुपयांवरून पाचशे रुपये शुल्क आकारले जावे, असा ठरावही मंदिर समितीकडून संमत करण्यात आला होता. दहा जुलैपासून या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते.
तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त मंडळाची बैठक चार जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली होती. या बैठकीत विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शन पास आणि अभिषेक पासबाबत यापूर्वी घेण्यात आलेल्या ठरावावर चर्चा करण्यात आली. सोमवारपासून दोन्ही ठरावांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि तसा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले होते.
दरम्यान, भाविकांकडून धार्मिक विधी कर अधिक आकारू नये त्यास पुजारी बांधवांचा विरोध असल्याचे निवेदन तुळजाभवानी पुजारी मंडळाकडून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना देण्यात आले होते. अखेर या करवाढीला वाढता विरोध पाहता मंदिर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे.