याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बस स्थानकात प्रवासी वृद्ध उभा होता. त्याचवेळी एक रुग्णवाहिका पार्किंगमधून बाहेर पडत होती. रुग्णवाहिका चालकाने स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशाला एकदा चिरडलं. मात्र हा प्रकार लक्षात न आल्याने रिव्हर्स घेताना पुन्हा चिरडलं.
अपघातानंतर त्याच रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेलं. परंतु उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.
रस्त्यावर उभ्या असलेली व्यक्ती रुग्णवाहिका चालकाला दिसली नाही का? असा सवाल विचारला जात आहे. त्याने गाडी मागे घेताना कुठलीही काळजी घेतली नसल्याचे या घटनेवरून समोर येत आहे. मात्र एका व्यक्तीला नाहक आपला जीव गमावावा लागला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास करण्याचे काम सुरु आहे.
रुग्णवाहिका ही नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी असते मात्र एका रुग्ण वाहिकेमुळे नागरिकाचा जीव गेला आहे. त्यामुळे रुग्ण वाहिका चालकांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.