घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाखाण येथे डॉ. राजेश मारुती शिंदे यांचा अनेक वर्षांपासून दवाखाना आहे. तेथे काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास आठ दरोडेखोरांनी लूट केली. घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व तेवढीच रोख रक्कम असा ३० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने शिंदे मळा परिसरात खळबळ उडाली आहे.
परिसरातील अनेक नागरिकांनी शिंदे यांच्या घराकडे गर्दी केली होती. शिंदे यांच्या राहत्या घरासह रुग्णालय व परिसरातील रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पाहण्यास सुरुवात केली आहे. या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात मदत होणार आहे. दरोडेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत. शहरात चोरी लूटमार याचे सत्र सुरू असतानाच ही घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, शहर गुन्हे अन्वेषणचे राजू डांगे यांच्यासह डॉग स्कॉड दाखल झाले आहे. त्यांनी घटनास्थळावरील परिसर पिंजून काढून पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला. कराड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.