मानखुर्द येथील प्रभाक क्रमांक १४१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे व विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विठ्ठल लोकरे यांनी पालिका पोटनिवडणुकीत मात्र पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. विठ्ठल लोकरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे बबलू पांचाळ यांचा १ हजार ३८५ मतांनी पराभव केला. लोकरे यांना ४ हजार ४२७ तर पांचाळ यांना ३ हजार ४२ मते मिळाली.
काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने या प्रभागात पोटनिवडणूक झाली. शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह एकूण १८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. एकूण १८ हजार ५४ पुरुष आणि १४ हजार ३२ महिला मतदार असे एकूण ३२ हजार ८६ मतदार या प्रभागात असून त्यापैकी १३,४७६ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये, ७३४४ पुरुष मतदार आणि ६१३२ महिला मतदारांचा समावेश होता. आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन अवघ्या एका तासातच निकाल हाती आला.
शेवाळेंचे वर्चस्व कायम
मानखुर्दची निवडणूक विठ्ठल लोकरे व बबलू पांचाळ या प्रमुख उमेदवारांमध्ये झाली असली, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे खासदार मनोज कोटक आणि सेनेचे खासदार राहुल शेवाळे असादेखील सामना होता. कोटक यांनी रणनीती तयार करत पांचाळ यांच्या विजयासाठी कंबर कसली होती. त्यातून शिवसेनेला आणि पर्यायाने शेवाळे यांना शह देण्याचा कोटक यांचा प्रयत्न होता. मात्र शेवाळे यांनी भाजपची डाळ शिजू दिली नाही. लोकरे यांच्या दणदणीत विजयाने शेवाळे यांचे या भागातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times