खडसे म्हणाले की, मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत, की ते अजित पवार यांच्या सोबत आहेत. स्वभाविक त्यांना जोडीदार हवा आहे. त्यामुळे ते प्रत्येकाला आवाहन करत आहेत. याचा अर्थ असा आहे की अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेलेले नाही. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. अजितदादांना त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की माझ्यासोबतही मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न दिसतो आहे. पण दुर्दैवाने अजून तरी त्यांना कोणी प्रतिसाद देत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटीलांच्या अजित पवार गटात सहभागी होण्याच्या आवाहनावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही बडे नेते नव्हते. मी भाजपमधून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. स्वतः अनिल पाटील हे सुद्धा भाजपचेच होते. मात्र गेल्या काळात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष प्रत्येकापर्यंत पोहोचला. संघटना मजबूत झाली. मात्र २०१९ नंतर निवडणुका झाल्या नाही. आता आगामी निवडणुकांमध्ये कोणाची ताकद किती आहे हे कळेल, असे आव्हानही एकनाथ खडसे यांनी मंत्री अनिल पाटीलांना दिले आहे.
मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावा केला होता. यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादीचे कार्यालय आमच्याच गटाकडे राहणार असल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, जळगावमधील राष्ट्रवादीचे कार्यालय हे ईश्वर बाबूजी यांच्या नावावर आहे. त्या कार्यालयावर बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे साडेआठ कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज आहे. ईश्वर बाबूजी यांची जळगाव जिल्हाध्यक्षांनी भेट घेतली. यात ईश्वर बाबूजी यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.
खडसे पुढे म्हणाले की, जोपर्यंत ईश्वर बाबूजी शरद पवार यांच्यासोबत आहेत आणि या कार्यालयावर असलेल्या कर्ज कोणी फेडत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे कार्यालय हे आमच्या गटाकडे राहणार आहे. त्यामुळे कुणाला हे कार्यालय हवं असेल तर त्यांना ईश्वर बाबूजींची संमती घ्यावी लागेल. ईश्वर बापुजी सध्या तरी शरद पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे ईश्वर बाबूजी हेच सध्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाबत काय तो निर्णय घेऊ शकतील. राष्ट्रवादीचे कार्यालय हे आमच्या गटाकडे म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडे राहणार असल्याचा दावा खडसेंनी केला आहे.
खडसे पुढे म्हणाले, सध्यातरी राज्यात कुणी काय बोलावं याचं बंधन राहिलेलं नाही. कोणी शैतान म्हणतात कोणी पप्पू म्हणतो तर कुणी काही म्हणत. राजकारण तर इतकं खाली गेलं आहे की, या लोकांविषयी जनतेत चीड आणि किळस निर्माण झाली आहे. शब्दांचा वापर नीट जपून केला पाहिजे. बहुतांश पक्षांची भूमिका आता अशीच दिसते आहे की त्यांनी त्यांचा दर्जा सोडूनच दिलेला दिसत आहे. शरद पवार यांचा राजकीय जीवन आणि उंची लक्षात घेता असे शब्द वापरणे योग्य नाही. सदाभाऊ खोत हे इतर पक्षांसोबत गेल्यानंतर मंत्री झाले. मात्र शरद पवार यांनी अनेकांना मंत्री केलं. त्यामुळे अशा पद्धतीचे शब्द उच्चारण योग्य नाही त्याचा मी निषेध करतो.
राणा दांपत्याच्या कार्यकर्त्यांनी विदर्भात उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडले आहेत. या विषयावर बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, ज्याचे त्याचे त्याठिकाणी फॉलोवर्स असतात. त्यामुळे भावना अनावर झाल्या तर असे प्रसंग घडतात. रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले, रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक महाविकास आघाडी माध्यमातून लढविली जाणार आहे. अजून जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा झालेली नाही. तसेच पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करते.