म. टा. प्रतिनिधी, नगरः करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे मार्च महिन्यापासून बंद आहेत. हि मंदिर उघडण्यात यावी, अशी मागणीही काही संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र नगर येथे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर येथे मंदिरबंदीचा नियम पाळतानाच गणेशभक्तांना ही गणरायाचे दर्शन घेता यावे , यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काच लावण्यात आली आहे. यामुळे मंदिरात प्रवेश न करताही गणरायाचे दर्शन गणेशभक्तांना होऊ लागल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर माळीवाडा भागात आहे. या मंदिरात गणेशोत्सव काळात दरवर्षी विविध उपक्रम होत असतात . तसेच तेथे नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून सुद्धा गणेशभक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा करोनामुळे येथे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तसेच हे मंदिर बंद असल्यामुळे गणेशभक्तांना मंदिराच्या बाहेरूनच बंद दरवाज्याचे दर्शन घेऊन जावे लागत होते. मात्र गणेश उत्सव काळात तरी मंदिर खुले करण्यात यावे, अशी मागणीही काही गणेश भक्तांकडून होत होती.

या मागणीवर एक नामी उपाय ट्रस्टने अंमलात आणला आहे. जेणेकरून करोना अनुषंगाने करण्यात आलेली नियमावलीही पाळली जावी , व गणेश भक्तांना मंदिराच्या बाहेरून का होईना पण गणरायांचे दर्शन व्हावे व एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळावे. त्यासाठीच ग्रामदैवत विशाल गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर संपूर्ण काच बसवण्यात आली आहे. तसेच या काचेसमोर बॅरिकेट्स लावण्यात आले आहे . त्यामुळे नियमानुसार गणेश भक्तांना मंदिरात प्रवेश मिळत जरी नसला तरी गणरायाचे मुखदर्शन त्यांना या काचेतून होऊ लागले आहे . आजपासून हा उपाय अंमलात आणला गेल्यामुळे दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत आहे.

दरम्यान, येथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. तसेच दर्शनाला येताना भाविकांनी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, अशी करोना अनुषंगाने असणारी नियमावली पाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here