Bhandara News : राज्यातील काही जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. त्यातील एक जिल्हा म्हणजे भंडारा. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाचा अन्य गावांशी आता संपर्क तुटला आहे. नदी दुथडी भरुन वाहत असल्यानं विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ छोट्या नावेतून जीवघेणा प्रवास करत आहेत.

मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ छोट्या नावेतून जीवघेणा प्रवास करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कुठलीही सुविधा किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. लाखांदूर तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर आवळी हे जेमतेम 500 लोकवस्तीचं गाव आहे. या गावाच्या चारही बाजूने चुलबंद नदीचा वेढा आहे. एकीकडे देशात सर्वत्र देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असताना मागील 75 वर्षापासून या गावाला जोडण्यासाठी नदीवर पुल बांधण्यात आलं नसल्यानं हे ग्रामस्थ या नदीतूनच जीवघेणा प्रवास करीत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पावसाळ्यात तर या गावाचा अन्य गावांसह तालुका आणि जिल्ह्याची संपर्क तुटतो किंबहुना कुठल्या विशेष गरजा पूर्ण करायच्या असल्यास त्यांना छोट्या नावेतूनच दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातूनच प्रवास करुन पूर्ण कराव्या लागत आहेत. मागील वर्षी नावेतून प्रवास करताना एक बोट नदी पात्रात मधोमध पोहोचल्यानंतर हेलकावे खाऊ लागली. मात्र नावड्यानं दाखविलेल्या समयसूचकतेनं सर्व प्रवासी सुखरूप बचावले होते.

चुलबंद नदीवर पुलाचं काम अर्धवट

गावाला जोडण्यासाठी चुलबंद नदीवर पुलाची निर्मिती करण्यात येत असून, त्याचे काम थंडगतीनं सुरू असल्यानं पुलाचं काम अर्धवट आहे. त्यामुळं यावर्षी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना नावेतून जीवघेणा प्रवास करावा लागणार आहे. आता पुन्हा एकदा ग्रामस्थांचा अन्य गावांशी संपर्क तुटलेला असतानाही प्रशासनानं अद्याप त्यांना कुठलीही सुविधा पुरवलेली नाही. 

गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

गोसीखुर्द धरणाच्या (Gosikhurd Dam) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 48 तासापासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडले आहेत. धरणातून 97232 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून पाण्याचा सातत्यानं विसर्ग होत असल्यानं आणि सुरू असलेल्या पावसानं भंडाऱ्याची जीवनदाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचं पात्र आता दुथडी भरून वाहू लागलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here