म. टा. प्रतिनिधी, पुणेः धरण क्षेत्रात सलग २२ दिवस झालेल्या पावसाने खडकवासला, पानशेत या धरणांनंतर वरसगाव धरणही भरल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे सुमारे ९९ टक्के भरली असून, या धरणांमध्ये २८.५७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघा अर्धा टीएमसी पाणीसाठा कमी राहिला असल्याने पुण्याचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला आहे.

धरण परिसरात तीन ऑगस्टपासून पावसाने हजेरी लावल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. खडकवासला, पानशेत या धरणांनंतर सोमवारी वरसगाव धरणही शंभर टक्के भरले. टेमघर धरण हे सुमारे ८५ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत चारही धरणांमध्ये २८.९७ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या धरणांमध्ये २८.५७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघा ०.४० टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

धरण क्षेत्रात अद्यापही पाऊस पडत आहे. दिवसभरात खडकवासला धरण परिसरात दोन मिलिमीटर, पानशेत धरण परिसरात आठ मिलिमीटर, वरसगाव धरण क्षेत्रात दहा मिलिमीटर आणि टेमघर धरण परिसरात १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत धरणातून खडकवासला धरणात १९८० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून, दिवसभरात २५६८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पवना धरण ९० टक्के भरले

पिंपरी चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात तुरळक पाऊस पडला. या परिसरात दिवसभरात पाच मिलिमीटर पाऊस झाला. हे धरण सुमारे ९० टक्के भरले असून, ७.६४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

निरा देवघर काठोकाठ भरले

जिल्ह्यातील भाटघर, वीर, नाझरे, कळमोडी, आंद्रा ही धरणे भरल्यानंतर निरा देवघर धरणही शंभर टक्के भरले आहे. भाटघर धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने नदीमध्ये पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. या धरणातून ४९०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून १८५४० क्युसेक, नाझरे धरणातून एक हजार क्युसेक, आंद्रा धरणातून ५१६ क्युसेक, कळमोडी धरणातून ६४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

उजनीत ४४.५२ टीएमसी पाणी

सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा वाढत आहे. हे धरण ८३ टक्के भरले असून, ४४.५२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here