मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इंदूरच्या राजेंद्र नगर पोलिस स्टेशनच्या बिजलपूरचे आहे. येथे अर्चना (वय २३) नावाच्या महिलेने रात्रीचे जेवण झाल्यानंतर आंबे खाल्ले होते. यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली. तिच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. बराच वेळ होऊनही तिचा त्रास काही कमी होत नव्हता. म्हणून कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अर्चनाचे सासरे बन्सीलाल अटेरिया यांनी सांगितले की, आंबे खाल्ल्यानंतर अर्चनाला डोकेदुखी सुरु झाली होती. तिला जवळच्याच डॉक्टरकडे नेण्यात आले, त्यांनी उपचार करुन अर्धा तास वाट बघायला सांगितले. मात्र, अर्चनाला घरी आल्यावरही भोवळ येत होती. यानंतर तिला उपचारासाठी युनीक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे बीपी सतत कमी होत असतानाच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, यापूर्वीही गावातील अनेक लोक आंबे खाल्ल्याने आजारी पडले होते.
शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल – पोलिस
पोलिस अधिकारी राघवेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, अर्चना आंबे खाल्ल्यानंतर आजारी पडल्या होत्या. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हे प्रकरण संशयास्पद असून पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
अर्चनाचं चेतन नावाच्या व्यक्तीशी दीड वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. चेतन हा शेतकरी असून तो प्रॉपर्टीचं कामही पाहतो. अर्चनाच्या अशा अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.