म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: सन २०२४मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांची दुसरी बैठक १८ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीत आणखी आठ पक्षांची भर पडली असून बैठकीला एकूण २४ ते २५ पक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला यूपीए अध्यक्ष सोनिया गांधीही उपस्थित राहणार असून, १७ जुलै रोजी त्यांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना रात्रीच्या स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे.

याआधी सर्व विरोधी पक्षांनी गेल्या महिन्यात पाटण्यात बैठक घेतली होती. तेव्हा १५ पक्षांचे ३२ नेते उपस्थित होते. आता बेंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत २४ ते २५ पक्ष सहभागी होणार आहेत. दिल्लीच्या अध्यादेशावरून काँग्रेससमोर अटी ठेवणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीगलाही काँग्रेसने या बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. या बैठकीपूर्वी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांना रात्रीच्या स्नेहभोजनासाठी आमंत्रित करणे, सर्व विरोधी पक्षांना बैठकीचे निमंत्रण देणे, या घटनेकडे विरोधी पक्षांची एकजूट आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

२०२४ ची मोर्चेबांधणी जोरात; पवार-ठाकरेंसह देशभरातील विरोधी पक्षांची पाटणामध्ये बैठक, संजय राऊतांची माहिती

दुसऱ्या बैठकीत आठ नवे पक्षही सहभागी होतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार बेंगळुरूतील बैठकीत सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार असल्याने बेंगळुरूतील बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

तीन कार्यगट:

विरोधी आघाडीचे संयोजक म्हणून नितीशकुमार यांचे नाव आघाडीवर आहे. बेंगळुरूच्या बैठकीत किमान तीन कार्यगट तयार करण्यावर विरोधकांचा भर राहील. पहिल्या गटाकडे भाजपविरुद्ध एक किमान समान कार्यक्रम तयार करणे आणि समान मुद्दे शोधणे ही जबाबदारी राहील. दुसरा कार्यगट राज्यांमधील आघाड्यांची ढोबळ रूपरेषा तयार करेल. प्रादेशिक पक्षांसोबतची ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच आहे का हेही ठरवले जाईल. भाजपच्या विरोधात विरोधकांचा एकच उमेदवार कसा उभा करायचा हा मुद्दाही मुख्य चर्चेचा असेल. तिसरा कार्यगट पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑगस्टपासून विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त सभांच्या तारखांवर काम करेल.

आधी मंत्रिमंडळ विस्तार मग खातेवाटपाचं तोरण, कुणाला लॉटरी तर काहींना डच्चू? धुसफूस टाळण्यासाठी दिल्लीत प्लॅनिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here