म. टा. प्रतिनिधी, : ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदीच्या काळात भूमिगत झालेले घरफोडे, दुकानफोडी करणारे सणावाराच्या काळात सक्रिय झाले आहेत. शहरातील विविध भागात रविवारी (२३ ऑगस्ट) रात्री १२ दुकाने फोडली. यामध्ये जटवाडा, हर्सूल, जयभवानीनगर आणि कामगार चौक या भागातील दुकानांचा समावेश आहे. या घटनांत किरकोळ साहित्य; तसेच रोख रक्कम चोरीला गेली आहे. संबंधित पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

हर्सूल, जटवाडा रोडवरील सईदा कॉलनी भागात चोरट्यांनी दहा छोट्या-मोठ्या दुकानांना लक्ष्य केले. यामध्ये नितीन अशोक परमार (रा. कुंवारफल्ली, राजाबाजार) यांचे जयदेव सॅनटरी हार्डवेअर नावाचे दुकान आहे. परमार रात्री जेवण केल्यानंतर दुकानाच्या वरीलमजल्यावर रात्री दोनपर्यंत जागे होते. त्यानंतर ते तेथेच झोपी गेले. पहाटे त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोराने हार्डवेअरचे साहित्य, रोख तीन हजार, लक्ष्मी मातेचा फोटो, चांदीचे शिक्के असे साहित्य लंपास केले. परिसरातील प्रभाकर मिरधे यांचे गणेश मेडिकल स्टोअर्स, अलिम देशमुख यांचे अंबर मेडिकल, गणेश गाडेकर यांचे सिद्धिका मेडिकल स्टोअर्स ही दुकाने फोडण्यात आले. त्यातून काहीही चोरीला गेले नाही. माऊली कलेक्शनमधून जिन्स पँट, किशोर हार्डवेअरमधून रोख, मोबाईल, धनश्री मोबाइल शॉपीतून तीन जुने मोबाइल, पौर्णिमा फोटो स्टुडिओमधून दोन महागडे कॅमेरे, काशीद पंक्चरमधून साहित्य, सितारा पान सेंटरमधून पुड्या, सिगारेट, चिल्लर असा ऐवज चोरांनी लांबवला; तसेच कामगार चौकातील महेश माळी यांच्या गुरुदत्त स्टेशनर्समधून ५०० रुपये आणि अथर्व लंच होममधून नेमके काय चोरीला गेले, याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंह जारवाल, जमादार शिवाजी झिने, पोलिस नाईक राजेंद्र सोळुंके यांनी पाहणी केली. याप्रकरणी बेगमपुरा आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोरट्यांचे ‘सीसीटीव्ही’त चित्रीकरण

जटवाडा हर्सूल भागात चोरटे दुकानाबाहेर असलेल्या एका ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्या’त चित्रित झाले आहे. हे दोन आरोपी अंधारात कारच्या बाजूला काही वेळ लपून बसले होते. यानंतर ते तेथून निघून गेल्याचे दिसत आहे. या ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणावरून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

गस्तीपथके नावालाच

गणेशोत्सवाच्या काळात रात्रीच्या सुमारास पोलिसांची ‘पेट्रालिंग’ वाढवण्यात येते. चोरट्यांनी जटवाडा, हर्सूल भागात दहा दुकानांना लक्ष्य केले आहे. चोरटे धुमाकूळ घालीत असताना गस्तीपथके कोठे गेली होती, हा प्रश्न पडला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here