अजित पवार यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. मात्र ही चर्चा खातेवाटपासंदर्भात नव्हती. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमित शहा यांची भेट घेण्यासाठीच पवार यांनी दिल्ली गाठल्याचे समजते.
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी तीनही पक्षांतील अनेक जण इच्छुक असतानाच, विस्तार तूर्तास होणारच नसल्याचे समजते. केंद्रातील विस्तार होईपर्यंत राज्यातील विस्तार करू नये, अशी भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतल्याचे कळते.
मुख्यमंत्री हे शुक्रवारपासून राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होत असून, रविवारी चहापानाचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री शुक्रवार आणि शनिवार दौऱ्यावर जाणार असतील, तर शपधविधीची शक्यता धूसर मानली जात आहे. दुसरीकडे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही गुरुवारी आपली तलवार तात्पुरती म्यान केल्याचे दिसले. १७ जुलैला मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलून १८ जुलैला आपला निर्णय जाहीर करू, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर असून, शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्ताने ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची आणि मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पेटाळा येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. महिन्यात दुसऱ्यांदा कोल्हापुरात येऊन ते आपल्या गटाची ताकद दाखविणार आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार, दोन आमदार असून, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व अनेक माजी आमदार, नेते या गटात आहेत. शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.