मुंबई :थिएटरमध्ये जाऊन पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणि थिएटरमालकांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात केंद्र सरकारकडून सिनेमागृहं प्रेक्षकांसाठी खुली करण्याची परवानगी मिळण्याची चिन्हं आहेत. अर्थात, चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स सुरू झाली, तरी नवीन चित्रपट कधी येतील यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम असेल. निर्माते लगेचच आपले चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.

पाच महिने व्यवसाय ठप्प असल्यानं थिएटरमालक, मल्टिप्लेक्समालक हवालदिल झाले आहेत. थिएटरशी संबंधित हजारो रोजगार धोक्यात आले असल्यानं सिनेमागृहांचा व्यवसाय पूर्ववत सुरू व्हावा यासाठी जोरदार हालचाली केल्या जाताहेत. केंद्र सरकारनं अलीकडेच सर्व राज्य सरकारांना आंतर राज्य, आंतर देश प्रवासावर असलेले निर्बंध मागे घेण्यास सांगितलं आहे. प्रवासासाठी लागणारा ई-पास रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत गेले तीन आठवडे मॉल्स कार्यान्वित आहेत. देशातील बहुतांश मल्टिप्लेक्स मॉलच्या इमारतीतच असल्यामुळे मल्टिप्लेक्स कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी नवीन नियमावली मात्र आखून दिली जाईल.

* पहिल्या टप्यात सिंगल स्क्रिन थिएटर उघडण्याची शक्यता.

* थिएटरमधील तापमान २४ डिग्रीपेक्षा अधिक ठेवावं लागेल.

* सिंगल स्क्रिन थिएटर उघडल्यानंतर काही दिवसांनी मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी.

* थिएटरमालक सर्व नियम पाळण्यास तयार.

* सिनेमागृहं सुरू झाल्यानंतर एक महिना नवा प्रदर्शित होणार नाही.

एक सोडून एक
केंद्र सरकार येत्या दिवसात सिनेमागृहं सुरू करण्यााबाबत दिशादर्शक नियमावली जाहीर करणार असल्याचं कळतंय. बिग बजेट ” चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलीकडेच अधिकृत घोषणा केली होती की, येत्या दिवाळीत थिएटरमध्ये ते हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी प्रदर्शन तारखेच्या अगोदरच थिएटर उघडणं महत्त्वाचं ठरेल. पुढील महिन्यात जेव्हा सिनेमागृहं सुरू होतील; तेव्हा ती केवळ एक तृतीयांश क्षमेतेनं चालवली जातील. आसनव्यवस्थेत एकानंतर एक खुर्ची रिकामी ठेवली जाईल. एकाच कुटुंबातील व्यक्ती सिनेमागृहांत असतील तर, त्यांच्यात असं अंतर नसेल. अशी नियमावली येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे.

थिएटरमालक तयार
नियमावलीबाबत वेब सिनेमाजचे उपाध्यक्ष योगेश रायजादा म्हणाले, की ‘आता तरी सिनेमागृहं उघडायलाच हवीत. आणखी किती दिवस नुकसान सहन करत थिएटर बंद ठेवायची? सरकारची नियमावली पाळण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. खरं तर मल्टिप्लेक्स सुरू झाल्यानंतर पुढील एक महिना कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होणार नाहीय. फक्त एकपडदा चित्रपटगृहांना परवानगी देऊन थिएटर व्यवसायाला फायदा होणार नाहीय. त्यामुळे देशभरातील सर्व एकपडदा आणि मल्टिप्लेक्स एकत्रच खुली व्हायला हवीत. जेणेकरून त्यात एकसूत्रात येईल.’ ३३ टक्के प्रेक्षकांनाच सिनेमागृहात प्रवेश देण्याबाबत योगेश सांगतात, की ‘नवीन चित्रपट प्रदर्शनासाठी नसल्यानं आम्ही जुने चित्रपटच पुन्हा प्रदर्शित करु. सुरुवातीला दहा टक्के सिनेमागृह जरी भरलं; तरी ती आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे.’

राज्य सरकार परवानागी देणार?
केंद्र सरकारनं सिनेमागृहं सुरू करण्याची परवानगी दिल्यांनतरही देशभरातील विविध राज्य सरकारची त्या-त्या राज्यात सिनेमागृहं सुरू करण्यासाठी परवानगी मिळणं आवश्यक आहे. सध्या देशभरातील विविध राज्यांमध्ये रुग्णांची संख्याही वेगवगेळी आहे. त्यामुळे तिथले नियम त्याच निकषांवर राज्य सरकारनं शिथिल केले आहेत. त्यामुळे केंद्राबरोबरच सर्व राज्य सरकारनी एकत्रित सिनेमागृहं उघडण्याबाबत मंजुरी देणं महत्त्वाचं ठरेल; असं जाणकार सांगतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here