अहमदनगर: महापालिकेने रॅपिड टेस्ट केल्यानंतर एका तरुणाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह देण्यात आला. मात्र, या तरुणाने जिल्हा रुग्णालयात टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल करोना निगेटिव्ह देण्यात आला. त्यामुळे या तरुणाला मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, असा प्रश्न पडला असून त्याने या संदर्भात एक पत्र मुख्यमंत्री यांना पाठवले आहे. या माध्यमातून करोना चाचणीमध्ये सुरू असलेल्या घोळावर प्रकाश टाकला आहे.

मुख्यमंत्र्याकडे पाठवलेल्या पत्रात या २४ वर्षीय तरुणाने म्हटले आहे की, ‘नगर शहर महानगरपालिकेतर्फे जी कोविड १९ अँटीजन (रॅपिड टेस्ट) तपासणी केली जाते, ही तपासणी खरंच कोविड सारख्या गंभीर महामारीचे निदान करते का? याबद्दल शंका आहे. मी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा प्रशासन, अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने आयोजित कोविड-१९ अँटीजन तपासणी उपक्रमांतर्गत जुने नगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणी केली. तपासणीनंतर दहा मिनिटांतच मला कोविड १९ ची लागण झाल्याचे सांगण्यात आले. मी खूप घाबरून गेलो व टेन्शन आले. परंतु मला चाचणीची शंका आली. कारण, तिथे प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह सांगत होते. मित्राशी चर्चा केल्यानंतर त्यानं मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्याचा सल्ला दिला. अजिबात विलंब न करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो व तिथे स्वॅब दिला. दोन दिवसांनी, २३ ऑगस्टला सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट घेतला, त्यात मी निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. २४ ऑगस्टला मी पुन्हा रॅपिड टेस्ट केली, ती पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी करोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ? असा प्रश्न मला पडला आहे.

‘रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यानं मी उपचारसाठी जिल्हा रुग्णालय येथे गेलो, तर तिथले डॉक्टर बोलले तुम्ही निगेटिव्ह आहात. तुम्हाला उपचारांची गरज नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनी वेगळाच सल्ला दिला. तुम्ही एचआरसीटी करा, हे रिपोर्ट आम्ही ग्राह्य धरत नाही. एचआरसीटी केल्यावर तुम्हाला नेमका काय त्रास आहे ते कळेल. पण माझ्या माहितीनुसार एचआरसीटीमध्ये निमोनियाची लक्षणे कळून येतात,’ असं या तरुणानं पत्रात म्हटलं आहे.

वाचा:

‘करोना टेस्टच्या नावावर जनतेची लूट सुरू आहे. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून सदर प्रकरणात योग्य ती कारवाई करावी व रॅपिड टेस्ट बंद करावी. मी स्वतः आता गोंधळून गेलेलो आहे की मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? या सर्व निगेटिव्ह, पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये माझे काही बरे वाईट झाले, तर सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल,’ असंही या तरुणानं पत्रात नमूद केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here