अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं अर्थ मंत्रालय अजित पवारांना मिळालं आहे. अजित पवार अर्थ मंत्रिपदासाठी आग्रही होते. तर शिंदेंच्या शिवसेनेचा याला विरोध होता. अजित पवारांना अर्थ मंत्रिपद मिळू नये यासाठी त्यांच्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र ते निष्फळ ठरले.
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या मंत्र्यांना धक्के बसले असताना दादा भुसेंना थेट सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळालं आहे. त्याआधी त्यांच्याकडे बंदरं आणि खनीकर्म मंत्रालय होतं. आता मात्र त्यांना मोठी लॉटरी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असणारं सार्वजनिक बांधकाम खातं मिळाल्यानं दादा भुसेंची पॉवर वाढली आहे. शिंदेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात महत्त्वाची कामं केली. मोठमोठे रस्ते, महामार्ग बांधले. आता हेच खातं त्यांनी भुसेंकडे दिलं आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्रालय मिळवणाऱ्या दादा भुसेंकडील पालकमंत्री काढून घेतलं जाण्याची दाट शक्यता आहे. नाशिकच्या येवल्यातून निवडून येणाऱ्या छगन भुजबळ यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. सध्या नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसेंकडे आहे. दादा भुसे हे भुजबळांना राजकारणात बरेच ज्युनियर आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपद भुजबळांकडे जाऊ शकतं. त्यामुळेच भुसेंना मंत्रिमंडळात चांगलं खातं दिलं गेल्याची चर्चा आहे.
शिंदेंच्या शिवसेनेतील दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मोठा धक्का बसला आहे. संजय राठोड यांच्याकडे असलेलं अन्न आणि औषध प्रशासन खातं काढून घेण्यात आलं आहे. त्याऐवजी त्यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण या तुलनेनं दुय्यम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार अजित पवार गटाच्या धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांनादेखील झटका बसला आहे. कृषी मंत्रालय सांभाळणाऱ्या सत्तार यांना यापुढे ल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्रालयाचं कामकाज पाहावं लागेल. त्यांच्याकडील कृषी विभागाची जबाबदारी अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्याचा फटका त्यांना मंत्रिमंडळात विस्तारात बसला आहे. त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती अजित पवार गटाकडे गेली आहेत.