कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. आणि त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठं खातं मिळालं आहे. मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण हे महत्त्वाचं खातं मिळालं आहे. खातेवाटपाची चर्चा असताना दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना दिलेली खुली ऑफर चर्चेत आली आहे. स्वतः हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खासगीत त्यांना सोबत येण्याचं निमंत्रण दिलं असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. शिवाय सोबत आला तर सर्व निवडणुकीत मित्र राहू असंही ते म्हणाले.

कोल्हापूरच्या राजकारणातील जय वीरूची जोडी म्हणून आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांनी एकमेकांच्या साथीने मिळून कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व ठेवलं आहे. गोकुळ जिल्हा बँक यासह महानगरपालिकेत आमदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची सत्ता आहे.
महाराष्ट्रात ‘कोल्हापुरी’ महाडिक पॅटर्न, निवडून येईल त्याच्या हातात कमळ, भाजपचा फॉर्म्युला
मुश्रीफ यांची सतेज पाटलांना ऑफर

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली दीड दशक मित्र असलेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात राज्यामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक गट थेट सत्तेत सहभागी झाला. आता अजित पवारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे मित्र रहावेत यासाठी त्यांना खासगीत आमच्या सोबत येण्याची ऑफर दिल्याचं जाहीर केलं आहे.

महिन्याभरातच दुसरा दौरा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिगत लक्ष घालण्यासारखं कोल्हापुरात आहे तरी काय?
आगामी विधानसभा, लोकसभा, महानगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुकीत सतेज पाटीलसोबत आले तर मित्र राहू, असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे त्यामुळे ते आमच्यासोबत आले तर विचारधारा एकच असेल. म्हणून मी त्यांना खासगीत आमच्या सोबत येण्याची खुली ऑफर दिल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज कोल्हापुरात सभा; पावसामुळे मात्र मैदानात सगळा चिखलच चिखल

‘उद्धव ठाकरेंनी आरोप केले पण माझी फक्त चौकशी झाली’

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भर सभेत आरोप केले होते. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी ईडी चौकशी वेळी आम्हाला गोळ्या घाला असं वक्तव्य केले होतं. आता तेच मुश्रीफ भाजपच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेवर मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. ‘उद्धव ठाकरेंवर अजूनही प्रेम कायम आहे’ असं मुश्रीफ म्हणाले. ईडीमुळे भाजपसोबत गेल्याचा काहीही संबंध नाही. या आधी आम्ही २०१४ ला भाजपला पाठींबा दिला होता. आणि आता मला न्यायालयाने दिलासा दिलेला आहे, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here