नवी दिल्ली : यशस्वी जैस्वालने दमदार शतक पूर्ण केले आहे. आता यशस्वीला आस असेल ती द्विशतकाची. आपल्या लाडक्या लेकाने पहिल्याच सामन्यात द्विशतक पूर्ण करावे, अशी इच्छा यशस्वीच्या वडिलांचीही आहे. पण ते फक्त इच्छा व्यक्त करून थांबले नाहीत, तर त्यांनी यशस्वीच्या द्विशतकासाठी साकडंही घातलं आहे.यशस्वीने पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आणि त्यानंतर त्याच्या वडिलांची एक खास मुलाखत झाली. त्यावेळी यशस्वीच्या वडिलांनी सांगितले की, ” यशस्वीने पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं. आमचं स्वप्न साकार झालं त्यामुळे आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत, आमच्या कुटुंबातील प्रत्येकजण आनंदी आहे. आमचा संपूर्ण भदोही जिल्हा आनंदात आहे, सर्वजण एकमेकांचे अभिनंदन करत आहेत. हा आमच्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणी सर्व जण आमच्या सोबत आहेत.”यशस्वीचे वडिल कावड यात्रेसाठी बाबा धामला जात होते. उत्तर प्रदेशमधील लोकं श्रावणात कावड यात्रेला जात असतात. त्यामुळे यशस्वीचे वडिल बाबा धाम यात्रेला जात होते आणि त्यावेळी एका रेल्वे स्थानकावर त्यांची खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी यशस्वीच्या वडिलांना विचारले की, आता तुम्ही बाबा धामला यात्रेसाठी जात आहात, तर यशस्वीसाठी तुम्ही काय मागाल? या प्रश्नावर यशस्वीचे वडिल म्हणाले की, ” यशस्वीने पहिल्या सामन्यात द्विशतक पूर्ण करावं, असं साकडं मी बाबांना घालणार आहे. यशस्वीने आतापर्यंत भरपूर संघर्ष केला आहे, त्यामुळे त्याच्या मेहनतीला यश मिळायला हवं, असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्या साठी मी बाबांकडे हे मागणं मागणार आहे.” उत्तर प्रदेशमध्ये सध्या श्रावण सुरु झाला आहे. या श्रावण महिन्यात कावड यात्रा केली जाते. त्यामुळे यशस्वीचे वडिल हे कावड यात्रेला जात आहेत. त्यामुळे या यात्रेला जाण्यापूर्वी त्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आता यशस्वीच्या द्विशतकासाठी त्यांनी साकडंही घातलं आहे. त्यामुळे आता यशस्वीचं द्विशतक होणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here