आदिका वारंगे या सफाई कर्मचारी असून त्या दररोज इमारतीमधील कचरा गोळा करायच्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मी कधी कधी महाजनी यांना पाण्याची बाटली आणल्यावर दरवाजापर्यंत नेऊ द्यायची. बुधवारी माझी सुट्टी होती. त्यामुळे मी कचरा घ्यायला गेले नव्हते. मंगळवारी रवींद्र महाजनी यांनी स्वत: माझ्या हातात कचरा दिला होता. कचरा देताना ते थोडफार बोलत असत. मी कचरा घेण्यासाठी दरवाजा ठोठावल्यानंतर ते आतून आवाज द्यायचे. मी काल सकाळी त्यांच्या घरी कचरा घेण्यासाठी गेले तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांना हाका मारल्या, दरवाजा ठोठावला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने मी निघून आले. मला वाटलं ते झोपले असतील, मग मी दुपारी कचरा घ्यायला गेले. तेव्हाही मी दरवाजा वाजवला, पण त्यांनी दार उघडले नाही. दुपारी त्याठिकाणी वास येत असल्याचे समजल्यानंतर मी पुन्हा रवींद्र महाजनी यांच्या घराकडे केले, तिकडे काही आहे का, हे मी पाहिले. मात्र, तिकडे काहीही कचरा किंवा घाण नव्हती, असे आदिका वारंगे यांनी सांगितले.
रवींद्र महाजनी या इमारतीमध्ये ३११ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहत होते. काल सकाळपासून बिल्डिंगमध्ये विचित्र वास येत होता. दुपारनंतर दुर्गंधी जास्त वाढली. त्यामुळे बिल्डिंगमधील रहिवाशांनी वास नेमका कुठून येत आहे, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. बिल्डिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहिल्यानंतर वास नेमका कुठून येतो, हे समजत नव्हते. बराच शोध घेतल्यानंतर सगळ्यांच्या नजरा तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रवींद्र महाजनी यांच्या फ्लॅट नंबर ३११ कडे वळल्या. याच फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करताच रवींद्र महाजनी घरात जमिनीवर पडलेले दिसले. आंघोळीनंतर कपडे घालताना ते पडले असावेत आणि त्यांना दुखापत झाली असावी. त्यानंतर कोणीही मदतीला न आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.