लडाखमधील भारत-चीन सीमेवर नियमांचे उल्लंघन करून चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना भ्याड हल्ला केला होता. त्यात २० भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चीनविरोधात देशात संतापाची लाट आली. भारतानं सूड घ्यावा अशी मागणी होऊ लागली. अखेर जनतेचा दबाव लक्षात घेऊन मोदी सरकारनं चीनची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेअरइट, टिकटॉक व हॅलो अॅपसह चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर देशवासीयांनी हे अॅप वापरणे बंद केले. अनेक भारतीयांनी मोबाइलमधून तात्काळ हे अॅप डिलिट करून टाकले. तसंच, चिनी वस्तूंवर उत्स्फूर्तपणे बहिष्कार टाकला.
मोदी सरकारच्या या निर्णयाची बरीच चर्चा झाली होती. चीनला झटका दिल्याचं बोललं गेलं. मात्र, आता बंदी घातलेल्या ह्यापैकीच एका अॅपचा वापर करत असल्याचं सचिन सावंत यांनी निदर्शनास आणलं आहे. ‘कॅमस्कॅनर’ हे ते अॅप आहे. ह्या अॅपचा वापर करून भाजपनं आपल्या पक्षांतर्गत नियुक्त्यांचं एक पत्रक स्कॅन केल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. ते पत्रकही त्यांनी शेअर केलं आहे.
‘चिनी अॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे स्पष्ट आहे,’ अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times