नगर : करोना रोखण्यासाठी मी जिल्ह्यात फिरत आहे. काही ठिकाणी बैठका घेतल्या. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर मी तयार आहे. पण माझ्या एकट्यावरच नव्हे तर पारनेरमध्ये आरोग्यमंत्री यांनी कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ३०० लोकांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. यांनी केली. एकट्या खासदाराला टार्गेट करण्यात काय अर्थ आहे?, असा सवालही त्यांनी केला.

खासदार सुजय विखे यांनी के.के.रेंज प्रश्नावर नगर, पारनेर, राहुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नसल्याचे समोर आले आहे. तसेच बैठकीला असलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क लावले नसल्याचेही फोटोमध्ये दिसून आले आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर विखे यांच्यावर टीका सुरू झाली होती. मात्र या टीकेला उत्तर देताना विखे यांनी आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले होते. त्यानंतर बोलत होते.

‘मी जेव्हा लॉकडाऊन लावा, असे म्हणत होतो तेव्हा तो लावला नाही. त्यामुळे मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली,’ असे सांगून विखे म्हणाले, ‘माझ्या जिल्हाबंदीची मागणी काहीजणांनी केली. पण त्यांना माझे फोटो दिसत असतील, तर त्यांनी या जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांचे फोटो देखील पहावे. ते भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम घेताना माझ्यापेक्षा दुप्पट गर्दी करीत आहेत. परंतु दुर्देवाने सत्तेच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत होत नाही. मी जनतेच्या कामासाठी फिरतोय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे, तर मी पूर्णपणे तयार आहे. मात्र फक्त माझ्या एकट्यावर हा गुन्हा झाला नाही पाहिजे. तर जे पारनेरमध्ये कोविड हॉस्पिटल उद्घाटनाला आरोग्यमंत्री आले होते, त्यांच्यापासून सर्वांवरच गुन्हा दाखल व्हावा. कर्जत-जामखेडमध्ये तर रोज भूमिपूजन होतात. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा. केवळ एका खासदाराला टार्गेट करून उपयोग नाही. त्यामुळे माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल झाल्यास, मी या सर्वांवर ही गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार, ‘ असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रकरणात झाकली मूठ सव्वा लाखाची, हे लक्षात ठेवून सर्वजण आपापल्या कामाला लागले आहेत. जनतेसाठी सर्व जण पळत आहेत. जनता देखील स्वतः या गोष्टीला मान्य करून पुढे सरकायला तयार आहे . आता लॉकडाऊन लावला नसेल तर जनतेच्या मनामध्ये भीती राहिली नाही. करोनाचा प्रादुर्भाव थांबलाय, असे सरकार म्हणते. प्रशासन म्हणते लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही, तर जनता ही भीती न बाळगता बाहेर पडते. कोणीही बंधन पाळायला तयार नाही. मी तर के. के. रेंज प्रश्नासाठी बाहेर पडलो आणि हा प्रश्‍न तीव्र करणार मी नव्हतो. तर हा प्रश्‍न तीव्र करणारे पारनेरला ज्यांनी आंदोलन केले ते होते. या आंदोलनानंतर खरतर मला जनतेमध्ये जावे लागले. अन्यथा करोना थांबण्याची वाट मी पाहू शकलो असतो,’ असेही ते म्हणाले.

के के रेंजबाबत दोन दिवसात खुलासा करू

‘के के रेंज संदर्भात मी, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, सुजित झावरे आदींनी एक पक्षाचे धोरण ठरवून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आम्ही गेलो. गेल्या ३० वर्षांचा प्रलंबित प्रश्न असल्याने आम्ही प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचे मत घेतले. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. यासंदर्भात दोन दिवसात सविस्तर माहिती देणार आहोत. यामध्ये केंद्राची भूमिका, राज्याची भूमिका, शेतकऱ्यांची भूमिका यावर सविस्तर खुलासा करणार आहोत,’ असेही खासदार सुजय विखे यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here