पुणेः येत्या २७ ऑगस्ट रोजी माजी खासदार हे बारामतीत दुध उत्पादकांसमवेत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीशी सूत जुळल्यानंतरही ते येथे मोर्चा काढत आहेत. राज्यातील एकूण संकलित दूध उत्पादनापैकी निम्मे दूध पुणे जिल्ह्यातच संकलित होत असल्याने दुधाचे आंदोलन येथून सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचा राजकीय अंदाज बांधला जात आहे.

राज्यातील दुध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असून २५ रुपये प्रतिलिटरचा दर राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचे सरकार आल्यानंतरही १७ ते १८ रुपयांवर घसरला आहे. उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने दुध उत्पादकांना दर मिळत असून प्रतिलिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च असलेल्या दुधाचा दर वाढवून द्यावा, दुधावरील जीएसटी रद्द करावी, केंद्र सरकारने दुधाच्या भुकटी आयातीचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या घेऊन स्वाभिमानीने दुध दर आंदोलन सुरू केले आहे.

येत्या २७ ऑगस्ट रोजी बारामतीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेट्टी यांनी केले असून या आंदोलनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नेमकी कशी राजकीय उभारी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राजू शेट्टी यांना नेमके काय साधायचेय?

सन २०११ मध्ये राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते, तेव्हा राजू शेट्टी यांनी नोव्हेंबर २०११ मध्ये गळीत हंगाम २०१२-१३ च्या पहिला हप्ता २३५० रुपये प्रतिटनी मिळावा यासाठी त्यांनी पंढरपूर ते बारामती ही पदयात्रा काढली होती आणि आघाडी सरकारविरोधात राळ उठवली होती. या आंदोलनानंतर त्यांनी बारामतीतच ठिय्या दिला आणि त्यांनी केलेल्या उपोषणाच्या घोषणेने राज्य सरकारही हादरले होते. राजू शेट्टी यांच्या या आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभरात चर्चेत आली. त्यानंतर मधल्या काळात भाजप सरकारशी या संघटनेने सूत जुळवले. त्यातून सदाभाऊ खोत हे राज्यमंत्री झाले. मात्र नंतर संघटनेत दोन विचारधारा झाल्या व खोत यांना संघटनेतून काढण्यात आले, खोत यांनी स्वतंत्र रयत क्रांती संघटना काढली. त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणूकीत राजू शेट्टी पराभूत झाले. आता राज्याच्या राजकारणातील अवकाश भरून काढण्यासाठी शेट्टी सातत्याने संधी शोधत आहेत.

मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात त्यांनी केलेले दूध दराचे आंदोलनही गाजले. विशेषतः त्यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात रेल्वे स्थानकात थांबून गुजरातमधून येणाऱ्या दुधाच्या रेल्वेस केलेला विरोध सर्वांच्याच लक्षात आला. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारलाही नमते घेत प्रतिलिटर २५ रुपये दराची घोषणा करावी लागली होती.

आता बारामतीत पुन्हा एकदा राजू शेट्टी येत आहेत. फरक थोडा पडला आहे. पुन्हा सरकार महाविकासआघाडीचे असले तरीदेखील राजू शेट्टी यांनी काळानुसार या सरकारशी मिळतेजुळते घेतले आहे. अशा परिस्थितीत त्यांचे हे आंदोलन पूर्वीसारखेच टोकदार होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अर्थात इंदापूर- बारामतीत दुधाचे अनेक प्रकल्प आहेत व सर्वाधिक दूध संकलन याच ठिकाणी होते. त्यामुळेही येथेच आंदोलन करण्याचा निर्णय शेट्टी यांनी घेतला असण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here