म. टा. प्रतिनिधी, जळगाव: निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या रागातून जिल्हा उपकारागृहातील दहा कैद्यांनी थेट कारागृह कर्मचाऱ्यांवरच हल्ला चढवल्याची घटना काल सोमवारी घडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने कारागृह अधीक्षकांनी पोलिसांना मदतीसाठी बोलावले होते. अखेर प्रशासनाने या दहा कैद्यांची रवानगी जालना कारागृहात केली. कारागृहातून पळून गेल्याच्या घटनेस महिना झाला असताना, कारागृहात ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

जेवणाचा निकृष्ट दर्जा असल्याचे सांगत कैदी रविसिंग बावरी, राम जाने, मिथुन सिंग याच्यासह दहा कैद्यांनी एकत्र येऊन कारागृह कर्मचाऱ्यांशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कैद्यांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण होत असल्याचे समजताच कारागृह अधीक्षकांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना फोन करून पोलिसांचा ताफा बोलविला. पोलिसांचा फौजफाटा कारागृहात दाखल झाल्यावर प्रकरण निवळले. हाणामारी करणाऱ्या दहा कैद्यांची अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांनी तातडीने सशस्त्र पेालिसांच्या मदतीने जालना कारागृहात रवानगी केली. या घटनेमुळे कैद्यांना बाहेरून मिळणारे साहित्य, जेवणाच्या डब्यांवर आता निर्बंध आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here