प्राथमिक माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरुवातीला शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात जवळपास पाऊणतास बैठक झाली. यानंतर अजित पवार यांनी आपल्यासोबत आलेल्या आमदारांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती शरद पवार यांना केली. शरद पवार यांनी शांतचित्ताने या सर्व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, त्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बैठकीत नेमके काय घडले, याचा तपशील सांगितला.
प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आज अजित पवार, विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आम्ही सर्वजण शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. जसं तुम्हाला माहिती आहे, काल दादांच्या नेतृत्वाखाली मंत्री आले होते. काल रविवार असल्याने आमदार मतदारसंघात होते. आज अधिवेशन असल्याने आमदार मुंबईत आहेत. शरद पवार यांचा आशीर्वाद मागण्याची संधी मिळून देण्याच्या निमित्ताने आम्ही आज याठिकाणी आलो. आम्ही माहिती काढली तेव्हा शरद पवार दुपारी यशवंतराव चव्हाण सेंटरला येणार असल्याचे समजले. म्हणून आम्ही इथे आलो. त्यांना भेटून आम्ही सर्वांनी आशीर्वाद घेतला. काल केली तशीच आजही पक्ष एकसंध राहण्याबाबत विनंती केली. त्यानंतर आता आम्ही परत जात आहोत. शरद पवार यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या मनात आता काय आहे, हे मी सांगू शकत नाही. आजही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यापलीकडे मला अधिक काही बोलायचे नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.