मुंबई: शिवाजीराव कर्डिलेंनी प्राजक्त तनपुरेंच्या आई आणि वडिलांनाही पराभव दाखवला. याचाच बदला प्राजक्त तनपुरेंनी घेतला आणि २०१९ ला हिशोब चुकता केला. राज्यमंत्री झाल्यावर वर्चस्वाचं राजकारणंही केलं आणि ताकद वाढवली.. जयंत पाटलांसारखा खंबीर नेता मामाच्या रूपाने पाठिशी असल्याने तनपुरेंचं मविआ सरकारमध्ये वजन होतं. पण आता पक्षात उभी फूट पडल्याने प्राजक्त तनपुरेही संभ्रमात होते. जिल्ह्यातील इतर आमदार अजितदादा गटात गेल्याने तनपुरेंसमोरचा पेच वाढलाय. जिल्ह्यातील आमदारांनी अजितदादांना साथ दिल्याने पक्षाला भगदाड पडलंय. त्यामुळे प्राजक्त तनपुरे एकटे पडलेत. पण दोन पिढ्यांपासूनच तनपुरे पवारांशी निष्ठावंत राहिलेत. प्राजक्त तनपुरेंनी आपले वडील प्रसाद तनपुरेंनी राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी शरद पवारांना साथ देत त्यांचे हात बळकट केले होते. आता राष्ट्रवादीत फूट पडली असातनाही प्राजक्त तनपुरे पवारांशीच एकनिष्ठ आहेत.

१९८० ते १९९५ पर्यंत प्रसाद तनपुरे काँग्रेसचे आमदार होते. १९९९ ला शरद पवारांना साथ देत त्यांनी राष्ट्रवादीकडून आमदारकी मिळवली. पण २००४ चंद्रशेखर कदमांकडून तनपुरेंचा पराभव झाला. २००९ च्या निवडणुकीतही शिवाजीराव कर्डिलेंकडून प्रसाद तनपुरेंना आव्हान देण्यात आले. या लढाईत तनपुरेंचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर २०१४ ला उषा तनपुरे मैदानात उतरल्या, पण शिवाजीराव कर्डिले यांनी पुन्हा विजय खेचून आणला. सलग तीन निवडणुकांत पराभव झाल्याने तनपुरेंच्या वर्चस्वाला धक्का लागला. पण प्राजक्त तनपुरेंनी गुलाल उधळून आई-वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला.

अजितदादांच्या गटाचे नाना प्रयत्न, पण बैठकीत शरद पवारांचा थंड प्रतिसाद, बाहेर येताच प्रफुल पटेल म्हणाले…

आई-वडिलांचा वारसा घेऊन प्राजक्त तनपुरे राजकारणात आले. २००५ ला प्रसाद साखर कारखान्याचे संचालकपदी त्यांची निवड झाली. यानंतर २०१६ ला राहुरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते विजयी झाले. २०१९ ला राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी पाच टर्म आमदार राहिलेल्या शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला. मविआ सरकार येताच प्राजक्त तनपुरे यांना राज्य मंत्री पदाची संधी मिळाली. त्यांनी सहा खात्याचा कारभार सांभाळला. अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर तनपुरे यांनी शरद पवारांशी निष्ठा कायम ठेवली.

मोठी बातमी: अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, आणखी एका भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

संग्राम जगताप, निलेश लंके आणि आशुतोष काळे… राष्ट्रवादीतील फुटीवेळी नगरमधल्या चार पैकी तीन आमदारांनी अजितदादांना साथ दिली. पण प्राजक्त तनपुरे एकटेच पवारांशी निष्ठावंत राहिले. एकीकडे जयंत पाटील शरद पवारांमागे बुरूजासारखे उभे असतानाच जयंतरावांच्या भाच्यानेही निष्ठा दाखवून दिली. जयंत पाटील राष्ट्रवादीकडून खिंड लढवत असल्याने अजितदादा गटाकडून तनपुरेंना खिंडीत पकडलं जाऊ शकतं. मात्र, अजित पवारांविरोधात राजकारण करायचं झाल्यास प्राजक्त तनपुरे एकट्यालाच खिंड लढवावी लागेल. प्राजक्त तनपुरेही मामा जयंत पाटलांप्रमाणे अजितदादांना अंगावर घेतील का?, हे आगामी काळात पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here