पुणे: पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पालघर, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यानुसार अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्यातील घाट भागात विशेषतः उद्या रात्री मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांना धोक्यांचे मूल्यांकन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना
अधिकाऱ्यांना धोक्यांचे मूल्यांकन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना
त्यानुसार, पुणे जिल्हा आपत्ती निवारण आराखड्यानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांना प्रचलित धोक्यांचे मूल्यांकन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा कर्मचारी आणि आवश्यक औषधांचा साठा करण्यात आला आहे. रुग्णवाहिका कार्यरत असून त्यात संपूर्ण इंधन आहे. अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहून सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. तालुका अधिकारी आज तयारीची पाहणी करणार आहेत.
राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार, कोकणला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस बरसणार असल्याची माहिती आहे.