सोमवारी यूपी एटीएसने सीमाची तब्बल ८ तास चौकशी केली. सीमाचे काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर सीमाला रात्री उशिरा घरी सोडण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सीमा, सचिन आणि तिच्या मुलाला पुन्हा एटीएस चौकशीसाठी घेऊन गेले. त्यानंतर त्यांना सेफ हाऊसमध्ये पाठवले.
मुंबई पोलिसांना सीमाला पाकिस्तानात पाठवण्याच्या आणि २६/११ सारख्या हल्ल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. मंगळवारी या दोघांची ११ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. सीमाची पॉलीग्राफी चाचणी घेण्याचाही एटीएस अधिकारी विचार करत आहेत.
यूपी एटीएसने सीमा हैदरचे सर्व सोशल मीडिया अकाउंटही स्कॅन केले आहेत. ज्यामध्ये दिल्ली एनसीआरमधील बहुतांश लोक तिच्याशी जोडले गेलेले आढळले आहेत. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून भारतीय लष्करातील काही जवानांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठवण्यात आली होती. सीमाने तिच्या अनेक वक्तव्यांवरून माघार घेतली आहे आणि चौकशीदरम्यान ती सतत रडत होती, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे.
सीमा आणि सचिन यांनी चौकशीदरम्यान एटीएसला सांगितले की, त्यांच्या नावाने कोणीतरी सोशल मीडियावर बनावट खाते तयार केले आहे. तर, तिचा भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याच्या प्रश्नावर सीमाने मौन बाळगले आहे. सीमा अनेक प्रश्नांवर एटीएसची दिशाभूल करत राहिली, अशीही माहिती आहे.
तर, सीमा तिच्या चार मुलांसह भारतात कशी आली? इंटेलिजन्स ब्युरोने (IB) सीमा सुरक्षा दलाकडून याबाबत अहवाल मागवला आहे. सीमा नेपाळमधून बिहारची सीतामढी सीमा पार करून भारतात आली. या सीमेच्या सुरक्षेसाठी एसएसबी तैनात आहे. आयबीने विचारले आहे की सीमा आणि तिच्या चार मुलांनी नेपाळचा टूरिस्ट व्हिसा असताना ती सीमा ओलांडून भारतात कशी आली? सुरक्षेत कुठे चूक झाली आहे? ही चूक आहे की षड्यंत्र आहे?, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न एटीएस करत आहेत.
सीमा हैदरनं भारतात येऊन तिचा प्रियकर सचिनसोबत लग्न केलं आहे. सीमाला चार मुलं आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीमा प्रसारमाध्यमांना मुलाखतीही देत आहे. मी हिंदू धर्म स्वीकारला आहे. मला आता भारतातच राहायचं आहे. मी पाकिस्तानला गेले तर माझी हत्या होईल, असं सीमानं सांगितलं आहे.